महाविकास आघाडीतील अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जिल्हास्तरीय प्रतिनिधींवर मनमानी कारभार करत असल्याचा आरोप केला आहे. स्थानिक पातळीवर समन्वय न ठेवता एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याने आघाडीतील नाराजी उघडपणे समोर येत आहे.
दरम्यान, मीरा–भाईंदरच्या राजकीय वर्तुळात आणखी एक गंभीर चर्चा रंगू लागली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पदाधिकाऱ्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप इतर पक्षांकडून केला जात आहे. यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मीरा–भाईंदरमध्ये केवळ १२ जागांवर उमेदवारीची मागणी करत आहे, तर काँग्रेसने २५ ते ३० जागांची मागणी केली आहे. दुसरीकडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सुमारे ७० जागांवर दावा करण्यात आल्याची माहिती आहे. या असमतोल मागण्यांमुळे आघाडीतील तिढा अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे.
उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज संध्याकाळपर्यंत महाविकास आघाडीतील हा तिढा सुटतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, चर्चा निष्फळ ठरल्यास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतकंच नव्हे तर, महाविकास आघाडीतील काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून अशीही चर्चा बाहेर येत आहे की, शिवसेनेने मनमानी धोरण कायम ठेवले तर शिवसेनेला डावलून इतर राजकीय पक्ष एकत्र येऊन स्वतंत्रपणे आघाडी करून निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे मीरा–भाईंदरच्या राजकारणात पुढील काही तास अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.






