शरद पवार-उदय सामंत यांच्यात भेट; भेटीवर मंत्री सामंत म्हणाले...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवर त्यांनी भाष्य केले. उदय सामंत यांनी या भेटीमागील कारणही सांगितलं आहे.
माध्यमांशी संवाद साधताना मंत्री सामंत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘अखिल भारतीय नाट्य परिषद ही संस्था आहे. त्याचे मुख्य विश्वस्त शरद पवार आहेत. शरद पवार विश्वस्त मंडळात आहे. त्यानुसार, त्यांनी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मी विश्वस्त म्हणून उपस्थित होतो. धोरणात्मक निर्णय घेण्याचे ठरले आहे. आता पुढील विश्वस्त आणि नियामक मंडळाची बैठक 11 सप्टेंबरला आयोजित करण्यात आली आहे. मी या प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे मला यावेळी बोलवण्यात आले होते.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पराभूत झाले, असे संजय राऊत यांनी मानले आहे. बेस्टच्या निवडणुकीत 12000 मते पडली. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदारांनी नाकारलं. त्यांना 2000 मतेही पडली नाही. बॅलेटवर मतदान घेऊनही मतदारांनी यूबीटीला नाकारलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी तीन कारणं दिली गेली. आता कुठलेतरी कारण शोधायचं, स्वत:चा पराभव दिसत असल्याने कोणावर तरी खापर फोडायचं म्हणून त्यांनी ईव्हीएमवर फोडले आहे, असेही सामंत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
जर खासदार राहुल गांधींना निवडणूक आयोगाने केलेल्या मतचोरीविरोधात यात्रा काढावी लागली, तर महापालिका निवडणुकांमध्ये आपल्या सोयीच्या प्रभाग रचना कराव्यात यासाठी हा मिंध्ये गट, भाजप किंवा इतर लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. जोपर्यंत या देशात मोदी, शहां सारखे लोक सत्तेवर आहेत, तोपर्यंत या देशात निवडणुका स्वच्छ आणि स्पष्ट वातावरणात कधीच होणार नाहीत, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
पैशांचा प्रचंड वापर
तसेच, मुंबई महानगरपालिका असो विधानसभा किंवा लोकसभा असो कारण इतकेच सांगेल की, पैशाचा प्रचंड वापर आणि सत्तेचा गैरवापर यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी हे कोणत्याही थराला जातील, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.