
Aaditya Thackeray
आदित्य ठाकरे यांनी जैन धर्माचा उल्लेख करत शाळेतील निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. महाराष्ट्रातील मराठवाडा, कोल्हापूर यांसारख्या भागात विविध धर्मांचे लोक एकत्र राहत असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘जैन धर्म शांततेवर आधारित धर्म आहे. तसे सर्व धर्म असतात. पण कुठल्याही धर्मावर स्वत:च्या धर्माची बंधने लादणे ही हिंसाच आहे,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.
त्यांनी पुढे शाळेतील निर्णयाचा संदर्भ देत, स्वतःच्या आहाराच्या किंवा धार्मिक श्रद्धांच्या पद्धती दुसऱ्या विद्यार्थ्यांवर लादणं योग्य आहे का, असा सवाल केला.
आदित्य ठाकरे यांनी आगरी-कोळी समाजाचाही दाखला दिला. एखाद्या समाजाच्या परंपरेनुसार एखादा पदार्थ नैवेद्य म्हणून खाण्याची पद्धत असेल, तर त्यावरही अशीच बंधनं आणायची का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘सगळ्यांनी सगळ्यांचा धर्म घरात पाळावा. दुसऱ्यावर लादू नये,’ असं ते म्हणाले.
याचवेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही सरकारला घेरलं. ‘हिंदुत्वावादी सरकार आहे, हिंदुत्वावर आक्रमण होत आहे, त्यांच्यावर काय बोलणार?’ असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, महापालिकेतील सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा शिंदे गटाचे अमेय घोले यांनी भाजपला दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावरही टीका केली. ‘ते काही महत्त्वाचे नाहीत. त्यांचं वक्तव्य आम्ही गांभीर्याने का घ्यावं? शिंदे गट त्यांचे गुलाम आहेत. त्यांनी मोठी विधाने करू नयेत,’ असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
आता मिरा-भाईंदरमधील शाळेच्या या निर्णयावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.