
'दुष्काळ जाहीर करा, अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही,' धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर
Dharashiv News : मराठवाड्याच्या विकासासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या; मात्र प्रत्यक्षात विकासकामांची गती अत्यल्प असल्याचा आरोप करत शिवसेना उबाठाने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘तुमसे ना हो पायेगा’ या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरल्याचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी धाराशिव येथे सांगितले.
आंदोलनात जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील, संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर, माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामल वडणे आदी उपस्थित होते.
दानवे म्हणाले, मराठवाड्याच्या विकासासाठी १७ सप्टेंबर २०२३ रोजी ४४ हजार कोटी रुपयांच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र त्यातील किती कामे प्रत्यक्षात आली, हा प्रश्न आहे. सरकार केवळ घोषणा करू शकते, विकास करणे त्यांना शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोप त्यांनी केला.
Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी
धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचा वेग अत्यल्प असल्याचा दावा करत त्यांनी कृष्णा-मराठवाडा प्रकल्पातील २३.६६ टीएमसी पाण्यापैकी अद्याप सात टीएमसी पाणीही जिल्ह्यात पोहोचलेले नाही, असे सांगितले. निविदा काढल्या जात असल्या तरी काही कामांमध्ये टक्केवारीसाठीच प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तुळजाभवानी मंदिर विकासासाठी निधी अपुरा असल्याचे सांगत दानवे म्हणाले, १,८०० कोटींच्या प्रकल्पासाठी वर्षाला केवळ २२ कोटी रुपये मिळणार असतील तर विकासासाठी अनेक दशके लागतील. विकासकामांमध्ये हातावर पोट असलेल्या स्थानिक व्यापाऱ्यांच्या हिताचाही विचार करणे आवश्यक आहे.
आमदार कैलास पाटील यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवरून सरकारला लक्ष्य केले. पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश अद्याप देण्यात आलेले नाहीत, असा आरोप करत सरकार कोणते ‘पंचांग’ पाहत आहे, असा सवाल त्यांनी केला.
गेल्या वर्षी नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. कर्नाटकात ३० टक्के पावसाची तूट असतानाही दुष्काळ जाहीर करण्यात आला; धाराशिव जिल्ह्यात पावसाची मोठी तूट असतानाही सरकार दुष्काळ जाहीर करण्यास तयार नसल्याचे ते म्हणाले.
“पिके वाळत आहेत; पिकांना पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध नाही. देव पाऊस देत नाही आणि देवा भाऊ वीज देत नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्याने करायचे तरी काय?” असा सवाल पाटील यांनी केला.
गेल्या वर्षी खरडून गेलेल्या जमिनीसाठी तीन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली होती. राज्यातील एकाही शेतकऱ्याला ही मदत मिळाली असे सरकारने सिद्ध करावे; तसे झाल्यास शिवसेनेतर्फे मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार करू, असे आव्हान त्यांनी दिले.
१७ सप्टेंबरपर्यंत दुष्काळ जाहीर केला नाही, तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला.
आमदार प्रवीण स्वामी यांनीही सरकारच्या घोषणांवर टीका केली. शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष रक्कम देताना तफावत असल्याचा आरोप त्यांनी केला. माकणी प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यांच्या पुनर्बांधणीचा प्रश्न, तसेच ३७ भूकंपग्रस्त गावांच्या निधीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.
Solapur News: ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा अनोखा एल्गार; झाडावर चढून अर्धनग्न आंदोलन, अडीच कोटींची थकबाकी
देशाचा जीडीपी जाहीर केला जातो, त्याचप्रमाणे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याचा जीडीपी दर जाहीर करावा, अशी मागणी स्वामी यांनी केली. धाराशिवचा जीडीपी दर केवळ दोन ते अडीच टक्क्यांच्या आसपास असल्याचा दावा करत जिल्ह्याच्या विकासासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मराठवाडा ही संतांची तसेच सहनशील लोकांची भूमी आहे. निजामाच्या काळातील अन्याय सहन केल्यानंतरही आज विकासातील भेदभाव सहन केला जात आहे. मात्र आता सरकारला प्रश्न विचारून विकासाचा हिशेब मागण्याची वेळ आली आहे, असे कैलास पाटील यांनी सांगितले.