MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीचे धागेदोरे मंत्रालयात; मंत्री नरहरी झिरवळ यांच्या OSD ची चौकशी!
यांसंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात अन्न आणि औषध मंत्री नरहरी झिरवळ यांचे विशेष कार्य अधिकारी गणेश देवरे यांची मुंबई विशेष शाखेच्या पथकाकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील आरोपी गौरव पाटीलच्या घरात झिरवळ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी भाडेकरु म्हणून राहत असल्याचे तपासात आढळून आले आहेत. आरोप गौरव पाटील यांच्या घरात झिरवळ यांचे ओएसडी गणेश देवरे हे गौरव पाटील यांच्या घरात राहत असल्याने पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्र्यांपर्यंत पोहचले नाहीत ना, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
गणेश देवरे हे गेल्या तीन वर्षांपासून गौरव पाटील यांच्या घरात राहत असल्याचे तपासातून समोर आला आहे. गणेश देवरे हे कृषी विभागात मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे आता गौरव पाटला आणि मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्याच्या कथित संबंधांमुळे या प्रकरणात अनेक शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत. मात्र, या संबंधावरून गैरप्रकारात त्यांचा सहभाग सिद्ध होत नाही. पोलिसांच्या तपासातून याबाबत नेमके काय समोर येते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
पेपरफुटी प्रकरणातील आरोपींचे नातेवाईक, परिचित आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती तपास यंत्रणांकडून तपासली जात आहे. याच तपासादरम्यान गणेश देवरे यांचा आरोपी गौरव पाटील यांच्याशी जवळचा संबंध असल्याची माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे.
आरोपी ऋतुजा पाटील, अमृत पाटील आणि गौरव पाटील, यांच्यासह मंत्री नरहरी झिरवळ यांचे OSD गणेश देवरे हे नंदुरबारमधील एकाच कॉलनीतील राहत असल्याचे तपासात आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर या व्यक्तींमधील नेमके संबंध काय होते आणि पेपरफुटी प्रकरणाशी त्यांचा काही संबंध आहे का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
धक्कादायक बाब मम्हणजे औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात प्रश्नसंच मिळवण्यासाठी पैशांचा व्यवहार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कार्यालयाच्या आवारातच झाल्याचा दावा तपासादरम्यान केला जात आहे. आयोगाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील पार्किंग लॉबीमध्ये पाच लाख रुपयांचा व्यवहार करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.
तपासातील माहितीनुसार, आयोगाच्या गोपनीय कक्षात उपलब्ध असलेल्या प्रश्नांपैकी 294 प्रश्नांचा स्वतंत्र प्रश्नसंच तयार करण्यात आला. अधिकारी विश्वेश्वर नकाते याने हा प्रश्नसंच गोपनीय कक्षातून बाहेर काढून त्याची झेरॉक्स केल्याचा आरोप आहे. त्यानंतर लॅपटॉपवर प्रश्न टाईप करून स्वतंत्र प्रश्नसंच तयार करण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे.
हा प्रश्नसंच नकाते याने अवर सचिव अभिजीत लेंडवे याच्याकडे दिल्याचे तपासात सांगितले जात आहे. त्यानंतर तो कक्ष अधिकारी गोपाळ मराठे याच्याकडे आणि पुढे प्रवीण पाटीलकडे देण्यात आल्याचे समोर आले आहे.
या संपूर्ण गौरव पाटील, गणेश देवरे यांच्यापासून अभिजीत लेंडवे यांच्या साखळीळे हा प्रश्नसंच गोपनीय कक्षातून बाहेर कसा पडला, आणि तो कोणाकोणापर्यंत पोहोचला आणि पैशांचा व्यवहार नेमका कुठे व कोणामध्ये झाला, यादृष्टीने तपास केला जात आहे.






