अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद झाली (फोटो - istock)
नाशिक : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम लागला आहे. मात्र तरी देखील सीमा भागांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दोन्ही देशातील युद्ध परिस्थितीवर अमेरिकेने मध्यस्थी करुन हे युद्ध थांबवलं असल्याचा दावा केला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 10 मे रोजी सायंकाळी पोस्ट करुन भारत आणि पाकिस्तानमध्ये बोलणी करुन युद्ध थांबवलं असल्याची सोशल मीडिया पोस्ट केली. मात्र या युद्धबंदीच्या तीन तासांनंतर काश्मीरमध्ये काही ठिकाणी ड्रोन हल्ले झाल्याचे दिसून आले. यानंतर आता राज्यातील नेत्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पुढे कुरापती होणार नाही असे वाटत नाही अशा शब्दांत अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच युद्धबंदीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, “कुठलंही युद्ध हे कधीतरी थांबत असते. ते योग्य वेळी थांबलं पाहिजे. अमेरिकेन आधी सांगितलं होतं, हा आमचा प्रश्न नाही. अमेरिकेने ही घोषणा केली मात्र पुन्हा युद्ध सुरू झाले होते. सध्या युद्ध थांबले आहे. हे समजत आहे. आमच्या लोकांवर हल्ला केला त्याचा सैन्याने मोठा बदला घेतला. पाकिस्तान हा विश्वास ठेवण्यासारखा नाही हे खरं आहे. त्यांना हा मोठा धडा मिळाला आहे. पुढे कुरापती होणार नाही असे वाटत नाही. अनेक दहशतवादी यात ठार झाले आहे. युद्ध थांबले असेल तर चांगलं आहे,” अशी प्रतिक्रिया नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.
भारत पाकिस्तान युद्धाच्या अपडेट घ्या जाणून
‘डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असं सांगण्यात येते हे चुकीचं आहे. ट्रम्प यांच्या सूचनेनंतर भारताने युद्धबंदी स्वीकारली. डोनाल्ड ट्रम्प याचा सबंध काय? माणसं आमची मेली मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प मध्यस्थीत कोणत्या अधिकाराने करतात. भारत स्वतंत्र राष्ट्र आहे,’ अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, “अमेरिका ही प्रबळ शक्ती आहे. त्यांनी ते सिध्द केलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका महाशक्ती आहे. युद्धाचा शेवट काय होतो ते संजय राऊत यांना माहिती आहे,” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दुनिया सब जानती है
AIMIM चे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या दाव्यावर उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की, “यांना जास्त मनावर घेऊ नका. सर्व देशाला एकमेकांच ऐकावं लागत. अजून आपण सक्षम नाही. हे युद्धाचं यश सैनिकांचं आहे. दुनिया सब जानती है,” असे सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या युद्ध हा पर्याय नाही यावर भुजबळ म्हणाले की,”दिल्लीत मोठ मोठे लोक बसले आहे. पहलगाममध्ये आपल्या भगिनींचे सिंदूर पुसले तेव्हा सर्व देशातून एक आवाज उठत होता बदला घ्या. असं कुठे असतं का आधी देशातले दहशतवाद संपतो आणि नंतर इतर,” असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे.