राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी जनतेला पत्र लिहिले आहे. (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तसेच मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली. राजकीय वर्तुळातून महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन झेंडावंदन देखील केले आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचं भावनिक पत्र लिहिले आहे.
राजकीय वर्तुळामध्ये अनेक उलथा पालख होत आहे. सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे नेचे राज ठाकरे एकत्र येतील का याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एक भावनिक पत्र प्रसिद्ध केले आहे. मुंबई, महाराष्ट्र, माय मराठी वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. जयंत पाटील यांनी मराठी माणसाला उद्देशून हे पत्र लिहिले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय आहे या पत्रात?
“आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन! भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर भाषेप्रमाणे प्रांत निर्मिती केली जात होती. परंतु भारत सरकारने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्यावरून मराठी-जनात क्षोभ उसळला. यातून प्रचंड तीव्र आंदोलन आणि मोठा लढा उभा झाला, शेवटी १९६० साली स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला.
स्व. यशवंतराव चव्हाण म्हणाले त्याप्रमाणे हा ‘सोनियाचा दिवस’ आपल्याला सहज मिळाला नाही, तर त्यासाठी तब्बल १०६ हुतात्मांनी आपले बलिदान दिले. त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर २१ नोव्हेंबर १९५६ साली झालेल्या मोर्चाचे देता येईल. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला. या निर्णयाचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात आला. तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा विरोध करण्यासाठी कामगारांचा विशाल मोर्चा फ्लोअरा फाऊंटन येथे पोहोचला. जमावबंदी, पोलिसांचा लाठीचार्ज अशा कोणत्याही कारवाईने मोर्चा आटोक्यात आला नाही. म्हणून शेवटी मोर्चा चिरडण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले आणि अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाले. हे सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, मुंबई, महाराष्ट्र आणि माय मराठीसाठी तिच्या लेकरांनी प्राणांची आहुती दिली तेव्हा मराठी देश स्थैर्य प्राप्त करू शकला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यंदा महाराष्ट्र राज्य आपला ६५वा स्थापना दिन साजरा करत आहे. गेल्या ६५ वर्षात महाराष्ट्राने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, औधोगिक, शैक्षणिक या सर्व स्तरांत उत्तुंग कामगिरी केली. पण मधल्या काळात महाराष्ट्राची प्रचंड पिछेहाट झाली आहे. दिवसाढवळ्या महिलांच्या अब्रूवर हात टाकला जात आहे, पाण्यासाठी लोकांना जीव गमवावा लागत आहे, शेतकरी हवालदिल होऊन आपले प्राण त्यागत आहे, राज्यकर्त्यांच्या मानगुटीवर ‘हिंदी’चे भूत बसले असल्याने आपल्याच घरात ‘मराठी’ हाल सोसत आहे. आपलेच परक्यांसोबत बसून महाराष्ट्राच्या वाटाघाटी करत असतील तर दुसरे काय होणार? आता हे कुठपर्यंत सहन करायचे? यासाठीच मराठी माणसांनी हौतात्म्य पत्करले होते का? होत्याचं नव्हतं झालं तर येणा-या पिढीला आपण काय उत्तर देणार? मुंबई, महाराष्ट्र, माय मराठी वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, असे मत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी पत्राद्वारे व्यक्त केले आहे.
सर्वांना महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
खडतर परिस्थितीतून, अमूल्य त्यागातून, अमर्यादित संघर्षातून हा दिवस आज आपल्याला पहायला मिळतोय. या गौरवशाली महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले पुरोगामी विचारांचे रोपटे देशासाठी नेहमीच दिशादर्शक राहिले आहे. मुंबई,… pic.twitter.com/IbnVXC1pFO
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 1, 2025