अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांनी जातिनिहाय जनगणनेवर प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
नांदेड : देशामध्ये जातीनिहाय जनगणना केली जाणार आहे. याबाबत केंद्र सरकारने निर्णय जाहीर केला आहे. जातीनिहाय जनगणना करण्यात यावी अशी विरोधक आणि कॉंग्रेसची मागणी होती. मागणी मान्य झाल्यामुळे विरोधकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. याबाबत अजित पवार गटाचे नेते व मंत्री नरहरी झिरवाळ यांनी देखील मत मत मांडले आहे, जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय योग्य असल्याचे झिरवाळ म्हणाले आहेत.
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी नांदेडमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. जातीनिहाय जनगणनेबाबत झिरवाळ म्हणाले की, “जातनिहाय जनगणना व्हावी ही बऱ्याच दिवसांची मागणी आहे. जातनिहाय जनगणनेचे सर्वेक्षण व्हावे, होऊ नये असे दोन्ही मतप्रवाह होते. जनगणना ही 2011 साली झाली. 2011 च्या नंतर जनगणना झाली नाही. जनगणना व्हावीच कारण जनगणनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या अडचणीला सामोरे जावं लागतं. म्हणून जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो योग्यचं आहे,” असे मत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महायुती सरकारकडून प्रशासकीय कामकाजांच्या 100 दिवसांचा निकाल जाहीर केला आहे. यावरुन विरोधकांनी टीका केली आहे. याबाबत मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, “शंभर दिवसाच्या प्रोग्राममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जे काही कार्यक्रम ठरवून दिला होता त्या प्रत्येक खात्यात कोणाचं काम प्रगतीवर आहे, प्रत्येक विभागात चांगल्या पद्धतीचे काम व्हावं हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न आहे. भविष्यात मुंबईमधील गर्दी कमी व्हावी म्हणून जिल्हाभरात फक्त एकदा नाही तर यापुढे शंभर शंभर दिवसाचं कामकाज होणार आहे. प्रत्येक विभागाला ते काम दिले जाईल आणि ते काम तेवढ्या दिवसात ते पूर्ण करायचं आहे. या निमित्ताने सर्वसामान्य लोकांच्या कामाची उकल वेळेत होत असते,” अशा शब्दांत त्यांनी या निकालाचे समर्थन केले आहे.
खासदार संजय राऊत यांनी पहलगाम हल्ल्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली होती. तसेच डिजिटल कारवाई केल्यामुळे देखील रोष व्यक्त केला होता. याबाबत नरहरी झिरवाळ म्हणाले की, “हा जो प्रश्न आहे तो देशाचा आहे. सर्व पक्ष मिळून जो झालेला प्रकार आहे अतिशय घृणास्पद आहे. त्यांच्यावर सरकारने अद्दल घडवली पाहिजे,” या मताचे आपण सर्वजण आहोत, असे नरहरि झिरवाळ म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजपचे नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना देण्यासाठा बॅंकेकडून 8 कोटी 86 लाखांचे कर्ज घेतले. मात्र नंतर शेतकऱ्यांना न देता या पैशांचा गैरवापर करण्यात आला. तसेच कर्जमाफीमध्ये हे कर्ज माफ करुन घेण्यात आले, असा आरोप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत झिरवाळ म्हणाले की, “याबाबत माझ्या कानावर अद्याप काही आलेलं नाही. जे काही असेल ते त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे ते योग्य ते निर्णय घेतील,” असे अजित पवार गटाचे नेते व मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले आहेत.