
Sanjay raut on pradeep purnekar case
Pradeep Purnekar Case : ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या हत्येनंतर पूर्णेकर कुटुंबीयांनी माजी महापौर आणि शिंदे गटाच्या नेत्या मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत हत्येत त्यांचाही सहभाग असल्याचा थेट आरोप केला होता. यावरूनच, ठाणे गुन्हे शाखेने राजेंद्र शिंदे यांची तब्बल नऊ तास चौकशी केली. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना सूचक इशारा दिला आहे.
याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देत ‘पोलिसांच्या तपासावर आमचं बारीक लक्ष असून, प्रमुख आरोपीला संरक्षण दिलं गेल्यास आम्ही आमचं हत्यार बाहेर काढू,’ असं राऊत म्हणाले.
ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी राजेंद्र शिंदे यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. यावेळी त्यांची आणि प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींची समोरासमोर चौकशी करण्यात आली.
राजेंद्र शिंदे यांनी पोलीस चौकशीत पाचही आरोपींना आपण ओळखत असल्याचं सांगितल्याची माहिती समोर आली आहे. हे आरोपी आपल्याकडे काम मागण्यासाठी येत असत. आपली पत्नी त्या भागातील ज्येष्ठ नगरसेविका असल्याने त्यांच्या भेटीगाठी होत असतात, असं त्यांनी चौकशीत सांगितलं. मात्र, पूर्णेकर यांच्या हत्येशी आपला कोणताही संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
राजेंद्र शिंदे यांच्या जबाबावर संजय राऊत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. “आरोपी काम मागायला येत होते, असं राजेंद्र शिंदे सांगत आहेत. मग त्यांना नेमकं कोणतं काम दिलं, हे आपण पाहतोच आहोत,” असा टोला राऊत यांनी लगावला.
“पोलिसांच्या चौकशीकडे आमचं बारीक लक्ष आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर प्रमुख आरोपीला संरक्षण दिलं गेलं, तर आम्ही आमचं हत्यार बाहेर काढू,” असा इशाराही त्यांनी दिला. बुधवारी (14 ऑकटोबर) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रदीप पूर्णेकर यांची 29 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ठाण्यातील मनोरमा नगर परिसरातील कार्यालयात हत्या झाली होती. पाच हल्लेखोरांनी कार्यालयात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला आणि कोयत्याने वार केले, असा वृत्तांत समोर आला होता.
या प्रकरणानंतर पूर्णेकर यांचे बंधू जयनाथ पूर्णेकर आणि मुलगा राम पूर्णेकर यांनी मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप केले होते. गणपती विसर्जनाच्या वेळी राजेंद्र शिंदे आणि मारेकऱ्यांना निळकंठ इमारतीबाहेर पाहिल्याचा, तसेच तिथे हत्येचा कट आखल्याचा आरोप राम पूर्णेकर यांनी केला होता. हे आरोप असून, त्यांची स्वतंत्रपणे पडताळणी होणं आवश्यक आहे.
दरम्यान, नऊ तासांच्या चौकशीनंतर राजेंद्र शिंदे यांना सोडण्यात आलं आहे. त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. मिनाक्षी शिंदे यांचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासातून पुढे काय समोर येतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
‘विरोध केल्यास खलास करू’; राष्ट्रवादीच्या आमदाराला धमकीचे पत्र, समान नागरी कायद्यावरून मोठी खळबळ!
Ans: प्रदीप पूर्णेकर यांची 29 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ठाण्यातील मनोरमा नगर परिसरातील त्यांच्या कार्यालयात हत्या झाली होती.
Ans: राजेंद्र शिंदे यांनी अटकेत असलेल्या पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं. हे आरोपी काम मागण्यासाठी आपल्याकडे येत असत; मात्र हत्येत आपला कोणताही सहभाग नसल्याचं त्यांनी म्हटल्याची माहिती आहे.
Ans: पोलिसांच्या तपासावर आपलं बारीक लक्ष असल्याचं सांगत, प्रमुख आरोपीला संरक्षण दिलं गेल्यास आम्ही आमचं हत्यार बाहेर काढू, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला.