
राहुल गांधींच्या TET पेपरफुटीवरील टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर; 'आधी आपल्या पक्षाकडे बघा'
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्य सरकारवर टीका केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पेपरफुटीप्रकरणी सरकारने वेळेआधीच कारवाई करून आरोपींना अटक केली असून परीक्षेचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पेपरफुटीबाबत राहुल गांधींना कदाचित माहिती नसेल की, महाराष्ट्र सरकारने पेपर फुटण्यापूर्वीच कारवाई करून आरोपींना पकडले. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी लागली. पुढील परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि योग्य पद्धतीने घेण्यात येईल. त्याच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.”
‘लाडकी बहिण योजनेबाबत काँग्रेस-उबाठाचे दावे दिशाभूल करणारे,’ शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांची टीका
राहुल गांधींवर निशाणा साधताना फडणवीस म्हणाले, “राहुल गांधींनी हे ट्विट भारतातून केलं की परदेशातून, हे माहीत नाही. ते अनेकदा परदेशात असतात. त्यांनी आधी त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या सरकारांची परिस्थिती पाहावी, त्यानंतर महाराष्ट्राबद्दल बोलावं.”
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी हे आंतरराज्यीय गुन्हेगारी टोळीशी संबंधित असून त्यांनी इतर राज्यांमध्येही अशा प्रकारचे पेपरफुटीचे गुन्हे केले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या कारवाईमुळे इतर राज्यांतील संभाव्य पेपरफुटीही रोखण्यात मदत झाल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, राहुल गांधी यांनी TET परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे मोठे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये नव्या परीक्षेची तारीख तातडीने जाहीर करणे, पेपरफुटीस जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करणे आणि या विलंबामुळे नुकसान झालेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देणे या मागण्यांचा समावेश आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर म्हटले होते की, पेपरफुटी करणारे मोकाट फिरत आहेत, तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना शिक्षा भोगावी लागत आहे. वर्षानुवर्षे मेहनत करून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे भविष्य अनिश्चिततेत असल्याची टीकाही त्यांनी केली होती.