'लाडकी बहिण योजनेबाबत काँग्रेस-उबाठाचे दावे दिशाभूल करणारे,' शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांची टीका
लाडकी बहिण योजनेतून ९२ लाख महिलांना वगळले, सरकारचे १४ हजार कोटी वाया गेले, अशी दिशाभूल करुन काँग्रेस आणि उबाठा या सावत्र भावांकडून राजकारण सुरु आहे, अशी टीका शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. लाडकी बहिण योजनेत पात्रता निश्चितीसाठी ईकेवायसीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
निरुपम म्हणाले की, लाडकी बहिण योजनेत सरकारचे १४ हजार कोटी वाया गेले, असा हास्यास्पद दावा काँग्रेस आणि उबाठाचे नेते करत आहेत. या योजनेतून ९२ लाख महिलांना वगळले हा विरोधकांचा दावा देखील साफ खोटा आहे. काँग्रेस आणि उबाठाकडे कोणतेच मुद्दे शिल्लक नसल्याने आता ते खोटी माहिती पसरवून राजकारण करत आहे. या योजनेत २९ हजार पुरुषांनी लाभ घेतला त्यांच्याकडून ते वसूल केले जातील, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली असल्याचे निरुपम म्हणाले. त्यामुळे हे पैसे वाया गेलेत असा विरोधकांचा आरोप बिनबुडाचा आहे.
निरुपम पुढे म्हणाले की, ९२ लाख महिलांना मागील १० महिन्यांपासून सरकारने दरमहा १५०० रुपये दिले आहेत. केवायसी छाननी करुन नावे वगळली आहेत, जी नियमानुसार आणि निकषांवर आधारित घेतलेला निर्णय आहे. महिला सक्षमीकरणाला काँग्रेस आणि उबाठाचा विरोध आहे. केंद्रात आणि राज्यातील महायुती सरकारकडून महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिले आहेत. देशातील २२ कोटी महिलांना विविध योजनांमधून लाभ दिले जात असून दर महिन्याला त्यासाठी सरकार १ लाख ७५ हजार कोटी खर्च करत आहे, असे निरुपम म्हणाले. लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, असे वचन शिवसेना मुख्य नेते व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनी चिंता करु नये, असे निरुपम म्हणाले. एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही, असे ते म्हणाले.






