
Raj Thackeray Uddhav Thackeray on Dnyanesh Kumar
निवडणूक आयोगाच्या कारभारावर देशभरात मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांनीही निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून मोठे जनआंदोलन उभारले जाणार असल्याची घोषणा केली आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. आता पुन्हा त्यांनी नव्याने पोस्ट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून येत्या 4 ऑकटोबर रोजी मुंबईत मोठा जनमोर्चा काढला जाणार असल्याचे नमूद केले आहे.
राज ठाकरेंनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून भाष्य करत म्हंटले कि, “देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या ४ ऑक्टोबर २०२६ ला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या आयोजनात जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे आणि हा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत.”
ते पुढे म्हणाले, “अर्थात महाराष्ट्रातील जनतेलाच आवाहन आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हा. बाकी मोर्च्याची वेळ आणि ठिकाण लवकरच कळवण्यात येईल. तेंव्हा एसआयआरविरोधातील या जन मोर्च्यात भेटूया ! या , देशातील लोकशाही आणि या देशाचे संविधान वाचवण्यासाठी एकत्र या !”
सस्नेह जय महाराष्ट्र,
देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या ४ ऑक्टोबर… — Raj Thackeray (@RajThackeray) September 26, 2026
आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या शेवटी त्यांनी ‘राज ठाकरे – उद्धव ठाकरे’ असे नमूद करत या लढाईत दोघेही ठाकरे बंधू एकत्र असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय आज (26 सप्टेंबर) सकाळीच संजय राऊत यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे आगामी आंदोलनाविषयी महत्वाच्या चर्चा झाल्याचे दिसून आले. आता 4 ऑक्टोबरच्या मुंबईतील जनमोर्चाला किती राजकीय पक्षांचा आणि जनतेचा प्रतिसाद मिळतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.