
Rohit Pawar
दुष्काळाच्या मुद्द्यावर राजेंद्र राऊतांचा रोहित पवारांवर हल्लाबोल.
‘अरे रोहित बाळा…’ म्हणत राऊतांची एकेरी टीका.
‘तुझ्या कर्जतमध्ये येऊन काय करतो ते बघ’, असा इशारा
मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळाच्या परिस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना सुरू आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पाण्याचं संकट आणि पिकांचं नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मदतीच्या उपाययोजना सुरू आहेत. अश्यातच, दुष्काळाच्या मुद्द्यावरून भाजपचे विधानपरिषद आमदार राजेंद्र राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राजेंद्र राऊत यांनी रोहित पवारांवर एकेरी भाषेत टीका केली. ‘अरे रोहित बाळा, तुझ्या काकाने सांगितलं होतं थोडक्यात हुकला. उपटसुंब्या कोणाला म्हणतो? तूच आजोबांच्या जीवावर उपटसुंब्या आहेस,’ अशी बोचरी टीका त्यांनी केली.
रोहित पवारांवर टीका करत राऊत म्हणाले, “दुष्काळाच्या काळात आपला मतदारसंघ सांभाळण्यासाठी आपण आणि आपले नेते देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. रोहित पवारांनी दुष्काळाच्या प्रश्नावर बोलताना वस्तुस्थिती समजून घ्यावी,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
राऊत यांनी यापूर्वीही रोहित पवारांना दुष्काळाच्या मुद्द्यावरून लक्ष्य केलं आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना रोहित पवार विविध मुद्द्यांवर आंदोलन करत असल्याची टीका त्यांनी केली होती.
आपल्या मतदारसंघात येण्याबाबत रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ‘माझ्या मतदारसंघात येण्याच्या गोष्टी करू नको. तुझ्या कर्जतमध्ये येऊन मी काय करणार आहे ते बघून घे,’ असा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी पवार कुटुंबाच्या राजकीय भूमिकेवरही टीका केली.
राऊत यांनी पवार कुटुंबावरही बोचरी टीका केली. ‘तुमच्या खानदानाचे काळे धंदे बाहेर निघू लागले की तोंड लपवून बसू नका,’ अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.
दुष्काळाच्या प्रश्नावरून पवार कुटुंबीयांनी यापूर्वी सरकारवर टीका केली आहे. रोहित पवार यांनीही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी, अशी मागणी केली असून सरकारने पुरेशी आर्थिक मदत जाहीर न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.
दुष्काळाच्या मुद्द्यावर रोहित पवार सध्या सरकारला लक्ष्य करत आहेत. त्यामुळे राजेंद्र राऊत यांच्या ताज्या टीकेला रोहित पवार काय प्रत्युत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून दुष्काळग्रस्त भागांसाठी विविध उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली आहे.