शिवसेना-राष्ट्रवादीला खिंडीत गाठत भाजपची ‘तिरकी चाल’; जिल्हा बँकेच्या आखाड्यात चार मंत्री आमनेसामने (फोटो सौजन्य-ChatGPT)
अनिल कदम, सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आता केवळ सहकार क्षेत्रातील निवडणूक राहिलेली नाही. जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाची पुढील दिशा ठरविणारा हा मोठा राजकीय आखाडा बनला आहे. महायुतीच्या माध्यमातून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचे ठरले असले, तरी प्रत्यक्षात २१ संचालकपदांसाठी तब्बल २३६ अर्ज दाखल झाल्याने महायुतीच्या अंतर्गतच मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे.(District Bank Election)
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मंत्री मकरंद पाटील हे जिल्हा बँकेच्या राजकारणातील आधीपासूनचे महत्त्वाचे चेहरे आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक केवळ प्रवेशाची नव्हे, तर विद्यमान प्रभाव अधिक मजबूत करण्याची लढाई आहे. दुसरीकडे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना जिल्हा बँकेच्या राजकारणात अपेक्षित स्थान मिळाले नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे बँकेच्या सत्ताकारणात आपली स्वतंत्र ताकद दाखविण्याची त्यांची इच्छा निर्माण झाली आहे, अशीही चर्चा आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या रणनीतीच्या बैठकीला देसाई आणि गोरे उपस्थित नसल्याची नोंदही वृत्तांत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपची ‘तिरकी चाल’ नेमकी कोणाला साधणार? हा प्रश्न जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.
Police Complaint Against Abhijeet Dipke: अभिजीत दिपकेंसह सहकाऱ्यांवर मुंबई पोलिसांत गु्न्हा दाखल
जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात खासदार उदयनराजे भोसले, माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मंत्री मकरंद पाटील आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे प्रमुख राजकीय घटक ठरणार आहेत. विशेष म्हणजे उदयनराजे समर्थकांकडे सुमारे २५० ठराव असल्याचे यापूर्वी वृत्त आले होते. दुसरीकडे शिवेंद्रसिंहराजे, मकरंद पाटील, नितीन पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडेही मोठी मतदार ताकद असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे जागावाटपाच्या वेळी प्रत्येक गटाची ताकद आणि अपेक्षा हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. म्हणूनच ‘कोण कोणासोबत आहे?’ यापेक्षा ‘कोण कोणाला सोबत घेतल्यास आपले गणित मजबूत होईल?’ हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.
महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचे सहकारी साखर कारखानदारी, सहकारी संस्था आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांत महायुतीतील नेत्यांशी जवळचे संबंध असल्याची चर्चा साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात नेहमीच होत आली आहे. व्यवहार आणि राजकारण वेगवेगळे ठेवून सार्वजनिक पातळीवर वेगळी राजकीय भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राच्या सहकार राजकारणात नवीन नाही.
त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिसणारे राजकारण आणि पडद्यामागील समीकरणे यामध्ये किती फरक राहतो, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. कोणता गट कोणाला उघडपणे विरोध करतो आणि प्रत्यक्ष मतांच्या गणितात कोणाची मदत कोणाला होते, हे माघारीनंतर अधिक स्पष्ट होऊ शकते.
सातारा जिल्ह्याच्या सहकार राजकारणावर अनेक वर्षे प्रभाव टाकणाऱ्या ज्येष्ठ नेतृत्वानंतर जिल्ह्यातील राजकीय-सहकारी सत्तेचे केंद्र नेमके कोणाच्या हातात जाईल, हा प्रश्न आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. यापूर्वी विविध निवडणुकांमध्ये सहकार संस्था, साखर कारखाने, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील समीकरणांचा परिणाम एकमेकांवर होत आला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक पुढील राजकीय नेतृत्वाची रंगीत तालीम मानली जात आहे.
या संपूर्ण राजकीय गणितात सहकारी साखर कारखानदारीचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सह्याद्री, कृष्णा आणि किसनवीर यांसारख्या कारखान्यांशी संबंधित सहकारी संस्था, ऊस उत्पादक आणि स्थानिक राजकीय समीकरणे जिल्हा बँकेच्या राजकारणावर परिणाम करू शकतात.
ऊस दरात मोठी तफावत निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम कारखान्यांच्या गाळपावर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर होऊ शकतो. दरात सुमारे १०० रुपयांची तफावत पडली तर काही कारखाने सुरू राहतील की नाही, याबाबतच प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी सहकार क्षेत्रात चर्चा आहे. त्यामुळे कोणत्या राजकीय गटाला सोबत घेतल्यास सहकारी साखर कारखानदारीचे गणित आपल्या बाजूने राहू शकते, याचाही विचार प्रत्येक गटाला करावा लागणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वयाबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा बँक निवडणुकीत तिन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मात्र जागावाटप आणि उमेदवारीवर अद्याप मोठी उत्सुकता कायम आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा आहे, जिल्हा परिषदेत दिसलेला ‘ट्रेलर’ आता जिल्हा बँकेत पूर्ण चित्रपट ठरणार का? २१ जागांसाठी २३६ अर्जांनी आधीच आखाडा तापवला आहे. ५ ऑक्टोबरची छाननी आणि त्यानंतरची माघार हा खरा टर्निंग पॉइंट ठरणार आहे.
CJP Shivaji Park Protest: तुमच्या खुर्चीचे दोन्ही पाय चिकटवलेले ! अभिजीत दीपकेंचा फडणवीसांना टोला
महायुती एकत्र राहते की अंतर्गत राजकीय महत्त्वाकांक्षा वरचढ ठरतात, भाजप आपली सहकारातील ताकद वाढवतो की राष्ट्रवादीचा पारंपरिक प्रभाव कायम राहतो, शिवसेना आपली स्वतंत्र जागा निर्माण करते का आणि या सर्व गणितात उदयनराजे, रामराजे, शिवेंद्रसिंहराजे व मकरंद पाटील यांची भूमिका काय राहते, यावर सातारा जिल्हा बँकेचा पुढील सत्ताकेंद्राचा कौल अवलंबून राहणार आहे. सहकाराचा गड, साखर कारखानदारीचे गणित आणि राजकीय वर्चस्वाची लढाई या तिन्हींचा संगम झाल्याने जिल्हा बँकेची निवडणूक आता साताऱ्याच्या राजकारणातील सर्वात लक्षवेधी सामना ठरण्याची चिन्हे आहेत.






