
Rohit Pawar farmer issue
Rohit Pawar : राज्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने अनेक भागांतील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पावसाअभावी पिकांचे नुकसान होत असून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकांवर नांगर फिरवण्यास सुरुवात केली आहे. अशातच राज्यातील मंत्री दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. मात्र, दुष्काळ जाहीर करण्यासह मदतीबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने विरोधकांकडून राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेले आमदार रोहित पवार यांनी सरकारच्या मदत प्रक्रियेवर टीका केली. शेतकरी मंत्र्यांना मदतीबाबत विचारतात, मात्र मंत्री मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे सांगतात. त्यामुळे निर्णय मुख्यमंत्र्यांनाच घ्यायचा असेल तर मंत्री आणि राज्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर येतात कशासाठी, असा सवाल रोहित पवार यांनी केला.
“मंत्र्यांकडे निर्णय घेण्याचीच क्षमता नसेल, तर मग तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर फिरता कशाला? मुख्यमंत्र्यांनाच बांधावर पाठवा आणि निर्णय घ्यायला सांगा,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
दुष्काळ आणि पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. मागील वर्षाचा प्रलंबित पीकविमा आणि यंदाचा पीकविमाही शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, चाऱ्याची उपलब्धता करून द्यावी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणीही त्यांनी केली.
परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यावरही रोहित पवार यांनी टीका केली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा काजू-बदाम खाण्यात अधिक रस असल्याचा टोला त्यांनी लगावला. जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना ‘विकासासाठी जात आहे’, असे म्हटल्याचा संदर्भ देत रोहित पवार यांनी “नेमका कोणाचा विकास करणार, परभणीच्या जनतेचा की स्वतःचा?” असा सवाल केला.
राज्यातील पावसाची स्थिती, पिकांचे नुकसान आणि दुष्काळाच्या मागणीवरून आता सरकारच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.