शरद पवारांच्या 28 सप्टेंबरपासूनच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला
Maharashtra Drought : राज्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यात परिस्थिती गंभीर बनली आहे. पावसाची मोठी तूट आणि लांबलेल्या पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांवर संकट आलं आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीटंचाईची चाहूल लागली असून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकांवर रोटावेटर फिरवण्यास सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत दुष्काळ आणि टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी पिण्याचं पाणी, शेतीसाठी पाणी, टँकर, जनावरांचा चारा आणि पिकांच्या नुकसानीवर चर्चा झाली.
दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार 28 सप्टेंबरपासून दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. काही दिवसांपूर्वी पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली होती.
शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यामुळे सरकारला काही फायदा होईल का, असा प्रश्न जयकुमार गोरे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी पवारांच्या अनुभवावरूनच खोचक प्रतिक्रिया दिली. ‘अशा अनुभवाने फायदा झाला असता तर राज्यात दुष्काळच पडला नसता,’ असं म्हणत गोरेंनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
राज्यात सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक कामं सुरू आहेत. ही कामं याआधी झाली असती तर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली नसती, असंही गोरे म्हणाले.
सोलापुरात यंदा पावसाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचं गोरेंनी सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यात जवळपास 80 टक्के पिकांचं नुकसान झालं आहे. पुढील 15 दिवसांत पाऊस पडला नाही तर नुकसान 100 टक्क्यांपर्यंत जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, जिल्ह्यातील 95 महसूल मंडलांपैकी 53 मंडलांमध्ये 20 सप्टेंबरपर्यंत 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस नोंदल्याचं ताज्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
सोलापुरात परतीचा पाऊस 15 ऑक्टोबरपर्यंत अपेक्षित असल्याचं गोरे म्हणाले. मात्र, पावसाची वाट बघत बसण्याऐवजी प्रशासनाला पिकांच्या नुकसानीचे सर्व्हे करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ‘शेतकऱ्यांनी पंचनामे होईपर्यंत पिकांवर रोटावेटर फिरवू नये,’ असं आवाहन गोरेंनी केलं. काही ठिकाणी पिकं पूर्णपणे हातातून गेली असली तरी काही भागात परतीचा पाऊस झाला तर पिकं पुन्हा उभी राहण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार
उजनी धरण भरलेलं असलं तरी जिल्ह्यातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचं गोरे म्हणाले. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन वर्षभराचं पाणी राखीव ठेवण्याचं नियोजन सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, शरद पवारांचा दुष्काळ दौरा, सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आणि सोलापुरातील गंभीर पाणी-पिकांचा प्रश्न यामुळे आगामी काळात दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.






