राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान (Photo - X)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवार गटातील नेत्यांच्या शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटींमुळे या चर्चांना आणखी जोर मिळाला होता. मात्र, आता खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजितदादा हयात असताना विलिनीकरणासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. (NCP Merger)
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. माझ्याशीही याबाबत कोणी चर्चा केलेली नाही. शरद पवार यांना अनेक लोक भेटत असतात. त्यात काही नवीन किंवा चुकीचं नाही. अजित पवार यांचा गट वेगळा झाला होता, तेव्हाही अनेक नेते पवारसाहेबांना भेटत होते.
दुसऱ्या पक्षात काय सुरू आहे, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यात आपण कशाला लक्ष घालायचं, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी अजित पवार यांच्या निधनाचा उल्लेख करत भावनिक प्रतिक्रिया दिली. ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्याच दिवशी मी या विषयावर पडदा टाकला. दादा होते तोपर्यंत विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. आम्ही काय करणार आहोत, हे जगाला माहिती होतं. पण माझा भाऊ गेला आणि विषय संपला, असं त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना नवा संदर्भ मिळाला आहे.
दरम्यान, अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही अलीकडे विलिनीकरणाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिल्या होत्या. तसेच अजित पवार गटातील काही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आला होता.
दोन्ही राष्ट्रवादींच्या काही नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. मात्र, सुप्रिया सुळे यांनी कोणताही अधिकृत प्रस्ताव आल्याचं नाकारलं आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सध्या तरी कोणताही ठोस निर्णय समोर आलेला नाही. दोन्ही गटांचे वरिष्ठ नेते पुढे काय भूमिका घेतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
NCP Merger News: अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
Ans: अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही आणि याबाबत कोणीही आपल्याशी चर्चा केलेली नाही, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.
Ans: अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत चर्चा आणि प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर आपण या विषयावर पडदा टाकल्याचं सुप्रिया सुळे यांनी भावनिक शब्दांत सांगितलं.
Ans: अजित पवार गटातील काही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी विलिनीकरणाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का, याबाबत राजकीय चर्चा सुरू झाली.






