
Shaktipeeth Expressway, Pune News,
Shaktipeeth Highway News: महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गासाठी पुणे विभागातील चार जिल्ह्यांमध्ये सुमारे ६२०० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी संबंधित जमिनींची संयुक्त मोजणी करण्यात येणार असून, मार्च २०२७ पर्यंत संयुक्त मोजणीसह आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिली.
जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या (एसआयआर) कामाचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त तेली-उगले सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाबाबत माहिती दिली.
शक्तिपीठ महामार्ग पुणे विभागातील चार जिल्ह्यांतून जाणार आहे. या मार्गासाठी मोठ्या प्रमाणावर खासगी जमीन संपादित करावी लागणार असून, सुमारे ६२०० हेक्टर क्षेत्र भूसंपादनासाठी प्रस्तावित आहे. भूसंपादनासाठी आवश्यक प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करून आता संयुक्त मोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे.
महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित होणार असल्याने संबंधित जिल्ह्यांतील जमीनधारकांचे प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे. संयुक्त मोजणीमध्ये कोणत्या जमीनधारकाची किती जमीन संपादित होणार, हे निश्चित होणार आहे. त्यानंतर भूसंपादन अधिसूचना आणि भरपाईची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यासोबतच जमीनधारकांना आवश्यक माहिती देण्यात येणार आहे. जमीनधारक आणि प्रशासनाच्या उपस्थितीत संयुक्त मोजणी करून संपादित होणाऱ्या क्षेत्राची निश्चिती केली जाईल. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे तेली-उगले यांनी सांगितले.
महामार्गाच्या अंतिम आखणीनुसार प्रत्यक्षात कोणत्या जमीनधारकाची किती जमीन संपादित होणार, याचे चित्र संयुक्त मोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मोजणीची प्रक्रिया जमीनधारकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. मार्च २०२७ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याने आगामी काळात शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग येण्याची शक्यता आहे.