अनिल देसाई थेट म्हस्केंच्या अंगावर धावले; सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात ठाकरे-शिंदे गटात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार ड्रामा झाला. माध्यमांशी बोलण्यापूर्वी नरेश म्हस्के आणि संजय राऊत यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.ही बाचाबाची सुरू असतानाच अनिल देसाई थेट म्हस्केंच्या अंगावर धावून गेले. या घटनेचा व्हिडीओदेखील सोशम मीडियावर व्हायरल होत आहे.
मिलालेल्या माहितीनुसार शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर संजय राऊत, अनिल देसाई आणि शिंदेचे नेते नरेश म्हस्के आमनेसामने आले. त्यावेळी दोन्ही गटात काही शेरेबाजी झाल्याने अनिल देसाई थेट म्हस्केंच्या दिशेने धावून गेले. या घटनेची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कोर्टाच्या बाहेर झालेल्या दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी झाल्या.
कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे संजय राऊत यांचा आत्मविश्वास उंचावला होता. त्यावेळी संजय राऊतांनी नरेश म्हस्के यांना आमनेसामने चर्चेसाठी बोलावले. मात्र, म्हस्के यांनी त्याला नकार दिला.
म्हस्केंनी नकार देताच राऊतांनीत्यांच्यासोबत असलेल्या अनिल देसाई यांना, “घेऊन ये त्याला,” असे म्हटले. त्यानंतर अनिल देसाई हे नरेश म्हस्के यांना आणण्यासाठी त्यांच्या दिशेने गेले. मात्र, म्हस्के तेथून निघून गेले.
नरेश म्हस्के निघून जात असल्याचे दिसताच संजय राऊत यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्याकडे पाहत, “अरे ये ना, यावंच लागणार आहे ना,” असे म्हटले. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये झालेल्या या शाब्दिक खडाजंगीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.






