'आत्मसन्मान मिळाला तर निश्चितच महायुती म्हणून विचार होईल'; शिवसेनेच्या 'या' बड्या नेत्याचं विधान(फोटो -सोशल मीडिया)
सातारा : महायुतीमधील घटक पक्षांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भाने शिवसेना शिंदे गटातील शिवसैनिकांचा सन्मान करावा. आत्मसन्मान मिळाला तर निश्चितच महायुती म्हणून विचार होईल. वाटाघाटी यशस्वी झाल्या तर एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाऊ मानसन्मान राखला तर ठीक. अन्यथा स्वबळावर लढू किंवा इतर चर्चेचे पर्याय आमच्यासाठी खुले आहेत, असे स्पष्ट संकेत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिले.
साताऱ्यात शिंदे गट शिवसेनेचा मेळावा नुकताच पार पाडला. या मेळाव्यात मार्गदर्शन केल्यानंतर शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावरआमदार महेश शिंदे, संजू राजे नाईक निंबाळकर, अनिकेत राजे नाईक निंबाळकर, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्र यादव, जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले, शिंदे गटाच्या जिल्हा संपर्कप्रमुख रेश्मा जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
देसाई पुढे म्हणाले, महायुतीला घटक मानून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जागा वाटपाला आमचे प्राधान्य राहील. मात्र, तिन्ही घटक पक्षांनी शिवसेनेला सन्मानाची वागणूक द्यावी. जागा वाटपात प्राधान्याने आमचा विचार व्हायला हवा वाटाघाटी यशस्वी झाल्या. तरच महायुती म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. मानसन्मान राखला तर ठीक अन्यथा स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमचे चर्चेचे सर्व पर्याय खुले आहेत जो आमच्याशी समविचाराने चर्चा करेल, त्या बाबतीत नक्कीच राजकीय समीकरणांचा विचार केला जाईल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
Ahilyanagar News: ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या ‘या’ महत्वाच्या नेत्याला हृदयविकाराचा झटका!
…तर शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवणार
पालिका निवडणुकीप्रमाणे महायुती झाली नाही तर यावेळी स्वतंत्र निवडणूक शिवसेना लढवणार आहे. शिवसेना पूर्ण ताकतीने आपल्या पद्धतीने निवडणुकीत उतरेल. कराडमध्ये पालिका निवडणूक ज्या पद्धतीने लढवली त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढवल्या जातील. यावेळी कोणाचाही विचार करणार नाही. फलटण पालिकेत आमचे काही अंदाज चुकले. त्यामुळे आम्हाला अपयश आल्याचे त्यांनी मान्य केले. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाबरोबर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आपल्याला आला नसल्याची त्यांनी स्पष्ट केले.






