पत्रकारांना धमकी प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा संजय दिना पाटील यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे गटातून बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी संजय दिना पाटील यांच्यावर टीका करत सुषमा अंधारे म्हणाल्या की, “जोपर्यंत हे नेते आमच्यासोबत होते तोपर्यंत शिस्तीत होते. मात्र पक्षांतरानंतर अवघ्या तीन दिवसांत सत्ता आणि पैशाचा प्रभाव त्यांच्या वागणुकीत दिसून येत आहे. माणूस किती बदलू शकतो, याचे उदाहरण संजय दिना पाटील यांच्या रूपाने समोर आले आहे,” अशी टीका त्यांनी केली.
संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना धमकी देताना “कोणत्या कमिश्नरकडे जायचं ते जा” असे वक्तव्य केल्याचा उल्लेख करत अंधारे यांनी गृहखात्यावरही प्रश्न उपस्थित केले. पोलिस आयुक्त आणि अधिकाऱ्यांनाही जुमानत नसल्याचे चित्र दिसत असून यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यात महिलांवरील अत्याचार, लोकलमधील गुन्हे, लोकप्रतिनिधींवरील हल्ले आणि अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या यांचा उल्लेख करत अंधारे म्हणाल्या की, आता पत्रकारांनाही धमक्या दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत गृहखाते नेमके कोणाच्या सुरक्षेसाठी काम करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या, “या राज्यात मुली सुरक्षित नाहित. महिला सुरक्षित नाहीत. लोकलमधील प्रवासी सुरक्षित नाहीत. लोकप्रतिनिधींना विधीमंडळाच्या परिसरात धक्काबुक्की होते. म्हणजेच लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचेही काही खरे नाही. अधिकाऱ्यांना खुल्या धमक्या दिल्या जात आहेत. आता पत्रकारांनाही धमक्या दिल्या जात आहेत.”
सुषमा अंधारे यांनी संजय दिना पाटील यांना देण्यात आलेल्या वाय प्लस सुरक्षेवरही टीका केली. “राज्याचं गृहखाते कोणाला सुरक्षा देण्यासाठी काम करत आहे. संजय दिना यांच्यासारखे उन्मत्त, गुंडगिरी करणाऱ्या लोकांना वाय प्लस सुरक्षा दिलेली आहे. या लोकांनी दिवसा पत्रकारांचे खून पाडावेत, यासाठी दीना पाटील यांना सुरक्षा दिली आहे का?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.






