खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकाराला धमकी; शिवसेनेच्या 'या' नेत्याकडून जाहीर माफी (Photo Credit- X)
मिळालेल्या माहितीनुसार, चालू राजकीय घडामोडींवर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर संजय दिना पाटील यांनी जाहीरपणे शिवीगाळ केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत माध्यमांना धमकावले. ते म्हणाले, “तुम्ही परत इकडे आलात तर तुम्हाला मारून पाठवेन, हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय. तुम्हाला जे करायचंय ते करा.” त्यांच्या या अशोभनीय वक्तव्यामुळे माध्यम क्षेत्र आणि राजकीय वर्तुळात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. “लोकप्रतिनिधीने पत्रकारांशी अशी भाषा वापरणे कितपत योग्य?” असा सवाल उपस्थित करत माध्यम क्षेत्राकडून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
खा.संजय दिना पाटील पत्रकारांना धमकी देत असतानाचा व्हिडिओ.. 👇 pic.twitter.com/fsPJ1aENuy — Sampat More I संपत मोरे (@SampatMore2) June 25, 2026
संजय दिना पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पक्षाची कोंडी झाल्यानंतर शिवसेना प्रवक्ते, आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी तात्काळ माध्यमांसमोर येत जाहीर माफी मागितली आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना शिरसाट म्हणाले, “गेल्या तीन-चार दिवसांपासून संजय दिना पाटील आणि संजय राऊत यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे. कोणी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देत आहे, तर कोणी स्टेनगन घेऊन फोटो काढत आहे. अशा प्रकारांचे कोणीही समर्थन करणार नाही. संजय राऊत यांनी वापरलेल्या अपशब्दांमुळे कदाचित भावनेच्या भरात किंवा फ्रस्ट्रेशन आणि रागातून संजय पाटील यांच्या तोंडातून हे वाक्य निघाले असावे. पण त्यांनी पत्रकारांना जे काही वेडेवाकडे बोलले, त्याबद्दल मी सर्व पत्रकारांची जाहीर माफी मागतो.” लोकशाहीत अशी भाषा कोणीही वापरू नये, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेले संजय दिना पाटील या वादामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संजय पाटील यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र, “त्या दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले, ते त्यांचे त्यांनाच ठाऊक,” असे म्हणत शिरसाट यांनी या चर्चांवर अधिक बोलणे टाळले.
‘महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला ,’ वाढत्या गुन्हेगारीवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा






