
‘राहुल गांधींचे महाराष्ट्रातील रिलाँचिंग करण्याचा प्रयत्न थांबवा,’ बावनकुळेंचा काँग्रेसला टोला
महाराष्ट्रातील शासकीय वसतिगृहांच्या प्रवेशातील वयोमर्यादा रद्द करावी, रिक्त पदांची भरती करावी आणि इतर मूलभूत मागण्या मान्य कराव्यात, यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. पुण्यातील मांजरी, नाशिक आणि नागपूर येथे आंदोलनासह आमरण उपोषण करण्यात येत आहे. या आंदोलनावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका होत असताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करून काँग्रेसकडून राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘रिलाँचिंग’ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांचे राजकारण करू नये, असेही त्यांनी म्हटले.
सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांशी यापूर्वी चर्चा केली असून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना लिखित आश्वासनही देण्यात आले असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
सरकार विद्यार्थ्यांशी तीनदा चर्चा करू शकते. गरज पडल्यास चौथ्यांदा नव्हे, तर हजारवेळाही संवाद साधण्याची तयारी सरकारची आहे, असे बावनकुळे म्हणाले. प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने असताना आंदोलन सुरू ठेवण्याचा आग्रह का धरला जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर राजकीय हेतूसाठी केला जात असल्याचा आरोप करत बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीका केली. राहुल गांधींच्या पुढील महाराष्ट्र दौऱ्यापर्यंत आंदोलन पेटते ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला.
आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत काँग्रेसला खरोखरच आस्था असेल, तर विद्यार्थ्यांना आंदोलनाचे राजकीय साधन न बनवता सरकारसोबत संवाद साधावा. ‘आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय स्वार्थ साधू नका,’ असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा आणि संधी वाढविण्यासाठी सरकार काम करत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडवणे हा सरकारचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र काँग्रेसला विद्यार्थ्यांच्या करिअरपेक्षा आपल्या नेत्यांचे राजकीय करिअर वाचवण्याची अधिक चिंता असल्याचा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधींच्या राजकीय पुनरागमनासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा वापर करणे महाराष्ट्र स्वीकारणार नाही, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.