पालकमंत्री उदय सामंत यांच्या विधानामुळे महायुतीत ठिणगी?
निसार शेख /चिपळूण: महायुतीतील वरिष्ठ नेते एकत्र येऊन आगामी निवडणुका लढवण्याच्या तयारीत असतानाच, युतीतीलच काही मित्रपक्षांचे नेते “स्वबळावर” निवडणूक लढवण्याची भाषा करू लागले आहेत. त्यांना खरंच स्वबळावर लढायचं असेल, तर त्यांनी ते करावं. मग काय करायचं ते आम्ही ठरवू, असा स्पष्ट इशारा राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी महायुतीमधील मित्रपक्षातील काही नेत्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ते म्हणाले, “वरिष्ठ नेते महायुती करण्यास तयार असताना, मित्रपक्षातील काही पिलावळ जर स्वबळाचा नारा देत असतील, तर त्यांना आपले धनुष्यबाण काय असते हे दाखवण्याची वेळ आली आहे.” या शब्दांत त्यांनी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम आणि भाजप नेते प्रशांत यादव यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
उदय सामंत पुढे म्हणाले की, “शिवसेनेने मदत केली नसती, तर येथे अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम निवडून आले नसते. तरीदेखील ते स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे सांगत असतील, तर त्यांनी एकदा माजी आमदार सदानंद चव्हाण आणि मला सांगावे. नाहीतर नुसती चिवचिव सहन केली जाणार नाही.” त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी महायुतीतील दोन मित्रपक्षांच्या नेत्यांना थेट इशारा दिला असून, त्यांच्या या विधानामुळे महायुतीत ठिणगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शहरातील बहादूरशेख नाका येथील पुष्कर सभागृहात शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते.
उदय सामंत म्हणाले, “जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात शिवसेनेची (शिंदे गट) मजबूत पकड आहे. तरीही आम्ही महायुतीसाठी आग्रही आहोत. आमचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळे अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, आणि आम्ही तो मान्य करू.”
“मात्र, युतीत राहूनच स्वबळाची भाषा करणाऱ्यांनी खरंच तसे करायचे असेल, तर त्यांनी खुलेपणाने जाहीर करावे. मग आम्हीही आमचा निर्णय घेऊ. आता वेळ आली आहे धनुष्यबाणाची ताकद दाखवण्याची,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सामंत यांनी चिपळूणमधील अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांच्यावर निशाणा साधला. “ते जर स्वबळाची भाषा करत असतील, तर त्यांनी ती उघडपणे मांडावी. आमचे कार्यकर्ते त्यांना उत्तर देतील. शेवटी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे,” असे ते म्हणाले.
तसेच भाजपचे नेते प्रशांत यादव यांनाही अप्रत्यक्षपणे इशारा देताना उदय सामंत म्हणाले, “कालपर्यंत जे लोक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम करत होते, आमदार किरण सामंत यांच्यावर विश्वास ठेवत होते, ते आता चौकशीच्या भीतीने भाजपमध्ये गेले, असे लोकच सांगत आहेत. त्यांनीही फार ढवळाढवळ करू नये.”
“आता वेळ आली आहे की प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गावात संघटना कशी मजबूत होईल, याकडे लक्ष द्यावे. दुसऱ्याच्या भागात न डोकावता आपले काम प्रामाणिकपणे करावे. नम्रपणे पक्ष वाढवण्याची हीच आमची आणि आमच्या नेत्यांची भूमिका आहे. कोणी काही बोलले म्हणून आपण काम थांबवायचं नाही. आपल्याला पक्षाचे अस्तित्व मतांमध्ये कसे परिवर्तन करेल, हे बघायचं आहे,” असे सामंत यांनी स्पष्ट केले.
राज्यातील ‘लाडकी बहिण’ योजनेविषयी बोलताना ते म्हणाले, “या योजनेतून राज्यातील तीन कोटी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळत आहेत. याचे संपूर्ण श्रेय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यावे लागेल. त्यांनी अनेक लोकाभिमुख योजना आणल्या असून, त्या योजनांचा प्रचार-प्रसार कार्यकर्त्यांनी करावा.”
महाविकास आघाडीवर टीका करताना सामंत म्हणाले, “मुस्लिम समाजात विष पेरण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे. मात्र, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साबीर शेख यांच्यासारख्या मुस्लिम नेत्याला मंत्रीपद दिले होते. शिवसेना नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेते आणि तसंच काम करत आहे.”
या पत्रकार परिषदेला शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख संदेश आयरे, रूपेश घाग, निहार कोवळे, दिलीप चव्हाण, शशिकांत चाळके, सिद्धार्थ कदम, संदीप सावंत, रश्मी गोखले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.