शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार
उल्हासनगरमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून निर्माण झालेल्या वादात शिवसेना पदाधिकारी कमलेश निकम यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबाबत विधान केले होते. या विधानाचे समर्थन करताना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांनी निकम यांनी केलेले विधान सत्य असल्याचा दावा केला. तसेच निकम यांच्याकडे त्यांच्या विधानासंदर्भात पुरावे असल्याचेही लांडगे यांनी सांगितले. लांडगे यांच्या या भूमिकेमुळे उल्हासनगरमधील राजकीय वाद कल्याण-डोंबिवलीतही चर्चेचा विषय ठरला आहे.
गोपाल लांडगे यांनी भाजपवर टीका करताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामांचाही उल्लेख केला. भाजपचे मंत्री आणि आमदार यांना जी कामे करता आली नाहीत, ती कामे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी करून दाखवली, असा दावा लांडगे यांनी केला. तसेच उल्हासनगरमधील स्वीकृत नगरसेवकांच्या निवड प्रक्रियेत भाजपचे उमेदवार अपात्र ठरले. भाजपला पात्र उमेदवारही देता आले नाहीत. मात्र, या अपयशाचे खापर शिवसेनेवर फोडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
गोपाल लांडगे यांच्या विधानानंतर कल्याण-डोंबिवलीतील भाजप नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. केडीएमसीचे सभागृह नेते वरुण पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. “आमच्या नेत्यांवर बोलण्याची शिवसेना पदाधिकाऱ्यांची लायकी नाही,” अशा शब्दांत वरुण पाटील यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांबाबत करण्यात येणाऱ्या विधानांवरून भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
केडीएमसीतील भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे यांनीही गोपाल लांडगे यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. गोपाल लांडगे हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असून, त्यांनी अशा किरकोळ वादात पडणे अपेक्षित नव्हते, असे कांबळे यांनी म्हटले. “या चिल्लर गोष्टींवर गोपाल लांडगे बोलतील, अशी आम्हाला अपेक्षा नव्हती,” असे सांगत त्यांनी लांडगे यांच्या भूमिकेवर टीका केली. रवींद्र चव्हाण यांची राजकीय उंची काय आहे, हे संपूर्ण जगाला माहीत असल्याचेही कांबळे यांनी म्हटले.
उल्हासनगरमधील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून सुरू झालेला स्थानिक राजकीय वाद आता कल्याण-डोंबिवलीतील दोन्ही पक्षांच्या नेत्यांपर्यंत पोहोचला आहे. एका बाजूला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांनी कमलेश निकम यांच्या विधानाचे समर्थन केले आहे, तर दुसरीकडे भाजपच्या वरुण पाटील आणि शशिकांत कांबळे यांनी लांडगे यांना प्रत्युत्तर दिले आहे. या शाब्दिक संघर्षामुळे स्थानिक पातळीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील मतभेद पुन्हा समोर आले आहेत.
उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवलीतील राजकीय घडामोडींमुळे दोन्ही पक्षांतील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
आता या वादात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?






