Vidhansabha 2024: निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हलचालींना वेग, ईव्हीएम सुरक्षा कक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
कल्याण/ दत्ता भाटे : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून सर्व सुरक्षेबाबत पाहणी सुरु आहे. ईव्हीएम सुरक्षा कक्ष तपासणी आणि मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मोहिम राबविण्यात आली.कल्याण डोंबिवलीतील मतदारांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत केलेल्या मतदानामुळे, मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाली आहे. आता सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीतही मतदानाचा हक्क बजावून, मतदानाची राष्ट्रीय सरासरी गाठुया असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.
हेही वाचा- Vidhansabha 2024: गुहागरमध्ये शरद शिगवण यांना उमेदवारी मिळावी, शिवसेना-कुणबी समाजाकडून होतेय मागणी
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभुमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी डोंबिवलीतील सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या मुख्य कार्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी तेथील ईव्हीएम सुरक्षा कक्षाची व मतमोजणी ठिकाणाची पाहणी केली आणि एकुण व्यवस्थेबाबत दोन्ही अधिका-यांनी समाधान व्यक्त केले व निवडणूक यंत्रणेस शुभेच्छा दिल्या.
जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात त्यांनी मतदानाचा हक्क बजाविण्याबाबत आवाहन केलं आहे. यासाठी त्यांनी कल्याण ग्रामीण मतदार संघाच्या कॅन्व्हासवर आपल्या स्वाक्षरीची मोहर उमटविली. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव, परिमंडळ-3 चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रध्दा चव्हाण, राजु राठोड, संजय भोये तसेच निवडणूक कर्तव्यावरील इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.