न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं पुण्यातील राहत्या घरी आज (सोमवारी) निधन झालं. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी साडेनऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत आणि कायदेपंडित म्हणून न्या. पी. बी. सावंत यांचा लौकीक होता. पुण्यात झालेल्या पहिल्या एल्गार परिषदेचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. अतिशय कडक शिस्तीचे आणि गाढा अभ्यास असलेले न्यायाधीश अशी त्यांची ओळख होती. अनेक महत्त्वपूर्ण आणि लक्षवेधी खटल्यांचे निकाल न्या. सावंत यांच्या कारकिर्दीत लागले.
३० जून १९३० हा न्या. पी. बी. सावंत यांचा जन्मदिन. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करायला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर ते दिल्लीला गेले आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांनी वकिली सुरू केली. १९७३ साली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९८९ साली सर्वोच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश झाले आणि १९९५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. [read_also content=”पेट्रोल भरावं की न भरावं, हा एकच सवाल आहे! https://www.navarashtra.com/latest-news/many-have-stopped-filling-petrol-due-to-high-rates-nraj-90273.html”]
२००३ साली गाजलेल्या चार मंत्र्यांच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकऱणी जो आयोग नेमण्यात आला, त्याचे अध्यक्ष न्या. पी. बी. सावंत हेच होते. २३ फेब्रुवारी २००५ मध्ये त्यांनी याबाबतचा अहवाल सादर केला होता. त्यात नवाब मलिक, पद्मसिंह पाटील आणि सुरेश जैन यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते, तर विजय गावित यांना दोषमुक्त ठरवण्यात आले होते. त्यामुळे नवाब मलिक आणि सुरेश जैन या दोन कॅबिनेट मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता.