फोटो सौजन्य- istock
हिंदू धर्मातील सर्वात मोठा, आनंदाचा आणि मांगल्याचा सण म्हणजे दिवाळी. दिव्यांची सुंदर रोषणाई, दारासमोरील रंगीबेरंगी रांगोळ्या, फटाक्यांची आतिषबाजी आणि फराळाचा घमघमाट यांमुळे संपूर्ण वातावरण उत्साहाने भरून जाते. अंधारावर प्रकाशाचा आणि असत्यावर सत्याचा विजय दर्शवणारा हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे.
संपूर्ण देशात हा सण उत्साहात साजरा केला जातो. अश्विन वैद्य त्रयोदशी तिथीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीला काही ना काही महत्त्व आहे. दिवाळीची सुरुवात नेमकी कधी होत आहे आणि या पाचही दिवसांचे महत्त्व सविस्तर जाणून घेऊया
14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू राम सीतेसह परत अयोध्येत आले ते या दिवसांत. त्यावेळी अयोध्येतल्या प्रजेने दीपोत्सव केला होता तेव्हापासून हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो.
गुरुवार, 5 नोव्हेंबर रोजी वसुबारस आहे. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी म्हणजे अश्विन वद्य द्वादशी तिथीला वसुबारस सण साजरा केला जातो. याला गोवत्सद्वादशी असे देखील म्हणतात. या दिवशी सुवासिनी सवत्स गाईची पूजा करतात. हा दिवस दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो.
शुक्रवार, 6 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो. हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी धनाची पूजा केली जाते. भगवान धन्वंतरीनी समुद्रमंथन करताना याच दिवशी आरोग्याची देवता आणि देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले होते. त्यामुळे या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. संपत्तीची देवता माता लक्ष्मी आणि संपत्तीचे भांडार सांभाळणारे भगवान कुबेर यांच्या कृपेने घरात सुख, समृद्धी आणि संपत्ती लाभावी म्हणून त्यांची पूजा केली जाते.
रविवार, 8 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान केले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 11.27 वाजता अमावस्येची सुरुवात होणार आहे. भगवान श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासूर राक्षसाचा वध केल्याच्या स्मरणार्थ आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो.
तर लक्ष्मीपूजनासाठी पूजा करण्यासाठी मुहूर्त सायंकाळी 6 ते रात्री 8.33 असा आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी घरात संपत्ती, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवता माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते.
अश्विन अमावस्या सोमवार, 9 ऑक्टोबर रोजी आहे. अमावस्येची सुरुवात रविवारी सकाळी होत आहे आणि त्याची समाप्ती सोमवार, 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.31 वाजता होणार आहे.
मंगळवार, 10 नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा आहे. या दिवशी कार्तिक महिन्याची सुरुवात होते. गोवर्धन पूजा देखील केले जाते. पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाला पाताळात पाठवले आणि त्याला पृथ्वीवर येण्याचे वरदान दिले.
बुधवार, 11 नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे. भाऊबीजेचा दिवस यमद्वितीय म्हणून देखील साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज असे नाव पडले. या दिवशी यम आपल्या बहिणीकडे गेला होता तेव्हा तिने त्याला ओवाळले आणि आनंद व्यक्त केला. तेव्हापासून बहिणीने भावाला ओवाळण्याची प्रथा सुरू झाली.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: यंदा २०२६ मध्ये नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन रविवार ८ नोव्हेंबर रोजी आहे
Ans: बहीण-भावाच्या प्रेमाचा सण असलेली भाऊबीज ११ नोव्हेंबर २०२६ (बुधवार) रोजी साजरी केली जाईल.
Ans: दिवाळी हा सण सलग पाच दिवस चालतो, जो धनत्रयोदशीपासून सुरू होऊन भाऊबीजेच्या सणापर्यंत समाप्त होतो.






