फोटो सौजन्य- pinterest
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे शक्तीपीठ म्हणून सप्तशृंगी गड ओळखला जातो. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी देवीचे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. देवीचे अठरा हात आणि प्रत्येक हाताता वेगवेगळी आयुधे असलेले रुप अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र देवीच्या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देवीची मान किंचित तिरकी असल्याचे दिसते.
देवीच्या साडेतीन शक्तीपीठांना आपल्याकडे सर्वांत मानाचं स्थान दिलं जातं. यामध्ये तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहुरची रेणुका देवी आणि वणीची सप्कशृंगी याचा समावेश आहे. पण वणीची सप्तशृंगी ही सर्व देवीपैकी वेगळी आहे. कारण तिची मान किंचितशी वाकडी आहे. तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का सप्तशृंगी देवीची मान का वाकडी आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया
यामागे एक कथा सांगण्यात येते. पुराणात असे घडले की, एकदा मार्केडेय ऋषी हे देवी सप्तशृंगीसमोर दुर्गासप्तशृंगीचे पठण करत बसले होते. देवी या पठणात मग्न झाली होती. पण हे सुरू असताना अचानक एक भक्त संकटांत सापडल्याचा आईला जाणवलं आणि त्याने मदतीसाठी देवीसमोर प्रार्थना केली. ही प्रार्थना सप्तशृंगीसमोर पोहोचताच तिने भक्ताचं रक्षण करण्याचं ठरवलं. देवी असली तरी तिचं हृद्य हे आईचं. आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी तिने क्षणांचाही विचार केला नाही आणि भक्ताला वाचण्यासाठी श्रवण सोडून ती मदतीला धावून गेली. आपल्या भक्ताच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि त्याचं संकट दूर केलं. पण या सगळ्यामध्ये ऋषींनी केलेल्या पोथीचं श्रवण अर्धवट राहिल्याने देवी सप्तशृंगीची मान वाकडी झाली, असं पौराणिक कथेत सांगण्यात आले आहे.
शास्त्र, परंपरा आणि विधी यासगळ्यापेक्षा ही अधिक देवी आपल्या भक्तांच्या आकेला धावून जाते असा विश्वास आहे. ती आपल्या भक्तांच्या हाकेकडे मान वळवून पाहते आणि म्हणूनच तिची प्रतिमा मान वाकडी असणारी आहे असा समज आहे.
सप्तशृंगी हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक अर्धपीठ मानले जाते. ‘सप्तशृंगी’ हे नाव या परिसरातील सात पर्वतशिखरांवरून पडल्याचे सांगितले जाते. देवीला दुर्गेचे शक्तिरूप मानले जाते आणि महिषासुरमर्दिनीच्या आख्यायिकेशीही तिचा संबंध जोडला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






