सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : लोकनेते, शेकापचे माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) तथा आबासाहेब यांचे सोलापूर येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सांगोल्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. चिरंजीव पोपट देशमुख यांनी मुखाग्नी दिला. अंत्यविधीस लाखोंच्या संख्येनी कार्यकर्ते भावपुर्ण निरोप देण्यासाठी हजेरी लावली. लोकनेते गणपतराव देशमूख यांच्या अंत्यसंस्कारावेळी राजकीय ,सामाजीक क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. ‘अमर रहे, अमर रहे गणपतआब्बा अमर रहे’च्या जयघोषाने त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
मृत्युसमयी गणपतआब्बा ९५ वर्षांचे होते. पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा त्यांच्या मागे परिवार आहे. सांगोला तालुक्यातील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे .देशमुख यांनी विधानसभेमध्ये तब्बल ५० वर्षे सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. सोलापूरमधील अश्विनी हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
देशमुख यांना काही दिवसांपूर्वी पित्ताचा त्रास होत असल्याने सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील झाली होती. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत होते. शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सांगोला येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
देशमुख यांचा १० ऑगस्ट १९२६ रोजी जन्म झाला. शेतकरी कामगार पक्ष व सांगोला विधानसभेच्या माध्यमातून गणपतराव देशमुख यांनी सलग पन्नास वर्षे आमदार म्हणून महाराष्ट्राची विधानसभा गाजवली. १९६२ साली ते सांगोल्यातून निवडून आले. त्यांनी शेकापमधूनच आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली होती. १९७८ साली शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या पुलोद सरकारमध्ये त्यांचा मंत्री म्हणून समावेश होता. त्याशिवाय १९९९ सालीही ते मंत्रिमंडळात होते.
२०१२ साली आमदार म्हणून सुवर्णमहोत्सवी ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल सभागृहामध्ये विशेष सत्कार केला होता. २०१९ साली त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. १९७२ आणि १९९५ या दोन पंचवार्षिक निवडणुकांचा अपवाद वगळता सर्व निवडणुकांमध्ये देशमुख यांनी विजय प्राप्त केला होता. २०१४ साली त्यांनी शेवटची विधानसभा निवडणूक लढवली. आजपर्यंत त्यांनी बारा वेळा विधानसभा निवडणूक लढवली. महाराष्ट्राच्या विधानसभेचा चालताबोलता इतिहास म्हणून गणपतराव देशमुख यांच्याकडे आजपर्यंत पाहिले गेले.
‘विधानसभेचे विद्यापीठ’ अशीही त्यांची राज्याच्या राजकीय वर्तुळात ओळख होती. एक पक्ष एक मतदारसंघ आणि एका विचाराने त्यांची आजपर्यंतची राजकीय कारकीर्द राहिली आहे. आमदार तसेच महाराष्ट्राचे रोजगार हमी योजनेचे मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिले.