बेअंत सिंग: बॉम्बहल्ल्यात मुख्यमंत्र्यांचा बळी; भारतीय इतिहासातील पहिली घटना
Beant Singh’s murder: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज सकाळी झालेल्या हल्ल्यामुळे राजधानीत एकच खळबळ उडाली आहे. रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण भारताच्या राजकीय इतिहासात असे अनेक मोठे गुन्हे घडले आहेत. भारतातील अनेक नेत्यांची सार्वजनिक ठिकाणी हत्या करण्यात आली होती. या यादीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. त्यातच रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर इतिहासातील एका गोष्टीची आठवण पुन्हा ताजी झाली आहे. देशात पहिल्यांदाच बॉम्बस्फोटाद्वारे एका मुख्यमंत्र्यांची हत्या करण्यात आली होती.
पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचा दुर्दैवी अंत संपूर्णदेशाने पाहिला. ३१ ऑगस्ट १९९५ हा दिवस भारताच्या इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून नोंदवला जातो, याच दिवशी देशात पहिल्यांदाच बॉम्बस्फोटाद्वारे एका मुख्यमंत्र्यांची हत्या करण्यात आली होती. ही घटना केवळ पंजाबसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी एक मोठा धक्का होता इतक्या क्रूर आणि सुनियोजित हल्ल्यात मुख्यमंत्री बेअंत सिंग यांची हत्या करण्यात आली. १९९२ मध्ये बेअंत सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले. ते पंजाबमधील फुटीरतावादी शक्तींवर नियंत्रण ठेवले होते.
खरंतर स्वातंत्र्यापासून पंजाब हा वेळोवेळी फुटीरतावादी चळवळी आणि हिंसाचारासाठी ओळखला जातो. १९८० आणि १९९० च्या दशकात पंजाबमध्ये फुटीरतावाद चांगलाच फोफावला होता. या काळात पंजाबमध्ये अनेकदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. परिस्थिती सुधारल्यानंतर १९९२ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला आणि बेअंत सिंग पंजाबचे मुख्यमंत्री झाले. बेअंत सिंग यांनी खलिस्तानी दहशतवाद चिरडण्यासाठी अनेक कठोर निर्णय घेतले. ज्यामुळे फुटीरतावादी संघटनांमध्ये त्यांच्याविरुद्ध खूपच राग होता.
त्यांच्या धोरणांमुळे पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित करण्यास मोठे योगदान मिळाले. मात्र, त्यामुळे ते अतिरेक्यांसाठी मोठे आव्हान ठरले. ३१ ऑगस्ट १९९५ रोजी, चंदीगड येथील सचिवालयाबाहेर बेअंत सिंग त्यांच्या बुलेटप्रूफ गाडीत बसत असतानाच भीषण स्फोट झाला. स्फोट इतका प्रचंड होता की परिसर धुराने आणि धुळीने व्यापून गेला. मुख्यमंत्र्यांची गाडी क्षणात तुकडे-तुकडे झाली आणि त्यांच्यासह आणखी १६ जणांचा मृत्यू झाला. स्फोटाचा आवाज दूरवर पोहोचला, तर रक्ताचे डाग आणि मांसाचे तुकडे आसपास पसरले. नंतर हल्लेखोराची ओळख दिलावर सिंग अशी पटली. तो आत्मघातकी हल्ला करणारा मानवी बॉम्ब होता. आपल्या शरीरावर स्फोटके बांधून त्याने हा हल्ला केला. या घटनेने केवळ बेअंत सिंग यांचा जीव घेतला नाही, तर पंजाबच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवरही खोल परिणाम केला.