फोटो सौजन्य: Instagram
“अरे, हा तर गे आहे!” असे म्हणून अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक ओळखीची चेष्टा केली जाते. त्यांच्यावर विनोद केले जातात, त्यांना समाजात दुय्यम वागणूक दिली जाते, अगदी माणूस असूनही त्यांना समाजापासून दूर ठेवले जाते. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाच्या माध्यमातून LGBTQ+ समुदायाबद्दल जनजागृती वाढली असली, तरी अजूनही अनेक गैरसमज समाजात आहेत.
समाजात असे अनेक लोक असतात जे स्वतःची लैंगिक ओळख लपवून जगतात. “लोक काय म्हणतील?”, “घरचे समजून घेतील का?” अशा प्रश्नांमुळे ते सतत भीतीतून जगतात. पण काही जण मात्र स्वतःची ओळख अभिमानाने मांडतात. अशाच व्यक्तींमध्ये निखिल जैन यांचे नाव अग्रस्थानी आहे. स्वतः गे असलेले निखिल फिलिपिन्समध्ये होणाऱ्या ‘Mr. Gay World 2025’ या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ते गेली 4 वर्षे LGBTQ+ समाजासाठी सक्रियपणे काम करत आहेत. नुकतीच त्यांनी नवराष्ट्रसोबत त्यांच्या या प्रवासाबद्दल सविस्तर चर्चा केली.
निखिल जैन हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असून सध्या ते फुल-टाइम कंटेंट क्रिएटर म्हणून सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यांचा जन्म 1992 मध्ये कर्नाटकातील दावणगेरे या छोट्या शहरातील पारंपरिक जैन कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब मध्यमवर्गीय होते.
लहानपणापासूनच मला जाणवत होतं की मी इतरांपेक्षा काहीसा वेगळा आहे. जसं तरुण मुलांना मुलींकडे आकर्षण वाढतं, तसं माझं आकर्षण मात्र मुलांकडे होत होतं. हे सर्व मी वयाच्या 18व्या वर्षी अनुभवायला लागलो. एकदा तर मनात विचारही आला की, “एखाद्या मुलीशी लग्न करून ही ओळख लपवावी का?” पण अखेर वयाच्या 25व्या वर्षी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारलं.
आई-वडिलांना सांगणं हे माझ्या आयुष्यातील सर्वांत कठीण क्षण होता. कारण मीडियाने नेहमी दाखवलेल्या गे व्यक्तींच्या ठराविक प्रतिमांमुळे ते गोंधळले होते. “आपला मुलगा तर अगदी सामान्य मुलांसारखा वागतो, मग तो गे कसा?” परंतु त्यांनी मला समजून घेण्याचा प्रयत्न केला, माहिती गोळा केली, तज्ञांशी बोलले आणि आज 4 वर्षांनंतर ते माझे सर्वात मोठे पाठीराखे आहेत.
Bihar Election Result 2025: निवडणूक जिंकल्यानंतरही आमदारकी रद्द होऊ शकते का, काय आहेत नियम?
या प्रवासात मला एक गोष्ट पक्की समजली की समाजातील मान, प्रतिष्ठा किंवा स्थान हे तुमच्या लैंगिक ओळखीमुळे ठरत नाही; ते तुमच्या कामामुळे, स्वभावामुळे आणि वागण्यामुळे मिळतं.
LGBTQ+ व्यक्तींना अनेक ठिकाणी छळ आणि चिडवणूक सहन करावे लागते. त्यांना छक्का, हिजडा अशी अवमानकारक नावं ठेवली जातात. अनेक पालक स्वतःच्या मुलालादेखील समजून घेत नाहीत. भारतात LGBTQ+ समुदायाबद्दल अजूनही मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे.
फिलिपिन्समध्ये होणाऱ्या ‘Mr. Gay World 2025’ या महत्त्वाच्या कार्यक्रमात निखिल भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या कार्यक्रमात ते भारतीय LGBTQ+ समाजाच्या प्रगतीत विविध NGOs कसे महत्त्वाचे योगदान देतात, याबद्दलही सांगणार आहेत.






