पर्यावरणातील नवदुर्गा - नेहा पंचमीया
सुनयना सोनवणे/पुणे: वन्यजीव आणि इतर प्राणी बचाव कार्य मोहीमांमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून समर्पितपणे कार्य करणाऱ्यांमध्ये ‘नेहा पंचमीया’ यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. प्राण्यांवर डोळस प्रेम करणाऱ्या नेहा यांनी २००७ मध्ये प्राण्यांच्या बचाव कार्यासाठी ‘रेस्क्यू चारिटेबल ट्रस्ट’ या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सक्रिय प्राणी बचाव संस्थेची स्थापना केली. याची सुरुवात एका साध्या फोन कॉलने झाली. एका नागरिकाने जखमी प्राणी पाहिला आणि त्याला मदतीसाठी कोणाला बोलवायचे हेच कळत नव्हते. त्या क्षणी नेहांना जाणवले की प्राण्यांच्या आपत्कालीन सेवेत मोठी पोकळी आहे. त्यांनी दुर्लक्ष न करता पावले उचलली आणि रेस्क्यूची सुरुवात झाली. काही जखमी प्राण्यांची सुटका करण्यापासून सुरुवात झालेला त्यांचा प्रवास वयाच्या केवळ २३व्या वर्षी एका मोठ्या ध्येयामध्ये रुपांतरित झाला. याची पायाभरणी २००७ मध्ये झाली. पण २०१६ नंतर या संस्थेला एक व्यावसायिक आणि संरचित असे स्वरूप मिळाले. त्या काळात नेहा आणि त्यांच्या टीमने नवीन केंद्र सुरू केले, प्रणाली विकसित केल्या, प्रशिक्षित टीम तयार केली आणि संकटात सापडलेल्या प्राण्यांसाठी सुरक्षित जागा निर्माण केली.
सुरुवातीला सगळंच कठीण होते. कोणतीही पायाभूत सुविधा नव्हती, आपत्कालीन परिस्थितीसाठी औपचारिक प्रशिक्षण नव्हते, जनजागृतीही मर्यादित होती. निधीची नेहमीच कमतरता भासत होती. तसेच संस्थांचा आणि लोकांचा विश्वास जिंकणे सोपे नव्हते. परवानग्या, कायदेशीर प्रक्रिया आणि टीम तयार करण्याचे आव्हानही मोठे होते. पण नेहा यांनी प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष कामातून शिकली आणि त्या पुढे जात राहिल्या. रेस्क्यूने आजवर २५० हून अधिक वन्य प्रजातींची सुटका आणि पुनर्वसन केले आहे. पक्षी, सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी अशा विविध जीवांचा त्यात समावेश आहे.
त्यातील काही मोहिमा खूप आव्हानात्मक होत्या. पुण्यातील दाट लोकवस्तीमध्ये बिबट्या शिरल्याची घटना त्यांना आजही विसरता येत नाही. क्षणोक्षणी बदलणाऱ्या परिस्थितीत, प्रचंड गर्दीत, माणसांचे आणि प्राण्याचे दोघांचेही रक्षण करणे, विविध संस्था आणि लोकांशी समन्वय साधणे हा एक तणावपूर्ण पण यशस्वी अनुभव होता.
नेहांच्या हृदयाला भिडलेली एक आठवण म्हणजे एका हिरव्या समुद्री कासवाचे रेस्क्यू! तो जवळजवळ मृतावस्थेत आला होता. दोन-दीड महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर, त्याला बरे करण्यासाठी कृत्रिम समुद्रपाणी तयार करण्यापासून ते मुंबईतून त्याला आवडणाऱ्या माशांची व्यवस्था करण्यापर्यंत टीमने सर्वकाही केले. शेवटी जेव्हा तो समुद्रात परत सोडण्यात आला, तो क्षण अतिशय भावनिक आणि प्रेरणादायी ठरला. या अनुभवाने नेहांना पुन्हा एकदा जाणवले की वन्यजीवांची लढण्याची ताकद आणि आपली चिकाटी व परिश्रम कधीही वाया जात नाहीत.
संस्था वाढत असताना घरची आणि कामाच्या ठिकाणाचीही जबाबदारी वाढत गेली, अपेक्षा वाढल्या, अनेकदा त्यांना बैठकीत दुर्लक्ष केले गेले त्यांचे ज्ञान कमी लेखले गेले, त्या फक्त चेहरा आहेत, खरा निर्णयकर्ता नाहीत, अशा गृहीतकांनाही सामोरे जावे लागले. तांत्रिक किंवा कार्यकारी कामात स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची वारंवार वेळ आली. पण नेहा यांनी या सगळ्या आव्हानांना न जुमानता आपल्या कामाला बोलू दिलं. त्या म्हणतात, प्रत्येकवेळी मला प्रतिकार मिळाला, तेव्हा मी अजून जोमाने काम करत राहिले.
नवरात्रीच्या निमित्ताने सर्व स्त्रियांना शुभेच्छा देत त्या म्हणाल्या, स्त्रियांना जर समान वागणूक हवी असेल तर स्वतःलाही त्या पातळीवर उभे करावे लागते. कधी कधी ती पातळी ओलांडावी लागते. स्त्री असल्याचं कारण देऊन स्वतःला रोखू नये. खरी ताकद म्हणजे शांतपणे सहन करणे नव्हे, तर योग्य गोष्टींसाठी धैर्याने उभे रहाणे आहे. ध्येय काहीही असो, समाजाने आखलेल्या मर्यादा स्त्रीचे भविष्य ठरवू शकत नाहीत. प्रत्येक स्त्रीमध्ये ‘शक्ती’ आहे, ती ओळखून, तिचा योग्य वापर करून, जगात आपली छाप सोडता यायला हवी. जेव्हा स्त्री खर्या अर्थाने उभी राहते, तेव्हा ती फक्त स्वतःचं नाही तर जगाचंही भविष्य बदलते. पर्यावरण, वन्यजीव आणि संशोधनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नेहा पंचमीया यांना ‘पर्यावरणातील नवदुर्गा’ म्हणून ओळखले जाते.