मराठमोळी मुंबईची तरूणी ‘मालगाडीतील गार्ड’, श्वेता घोणेचा 'तुफान एक्स्प्रेस' प्रवास
रात्री, अपरात्री किंवा कोणत्याही वेळी ड्युटी, वेळेचे नसलेले बंधन, तांत्रिक कौशल्य आणि कुशलता अशा सर्वच स्तरांवर भारतीय रेल्वेत मालगाडीचे गार्ड म्हणून कठीण जबाबदारी मानली जाते. या पदावर आतापर्यंत पुरुषांचं वर्चस्व जास्त पाहायला मिळतं होतं , तर महिलांची संख्या तशी विरळाच. मात्र, आता त्यास छेद देत मुंबई विभागात मालगाडीवरील पहिलीवहिली गार्ड (Train Manager) होण्याचा मान मराठमोळ्या श्वेता घोणे यांच्याकडे जातो. रेल्वेतील कठीण मानल्या जाणाऱ्या ‘मालगाडीतील गार्ड’ या पदावर मुंबई विभागात प्रथमच एका मराठमोळ्या तरुणीची निवड झाली आहे. 2015 पासून वर्षांपासून पनवेलपासून वसई, कल्याण, दिवा, जेएनपीटी, रोहा, पेणच्या हद्दीत मालगाड्या सुरळीतपणे पोहोचवण्याचे अवघड काम त्या खुबीने करत आहेत.
रेल्वेत सेवेत असलेल्या वडिलांचा वारसा समर्थपणे चालविण्याच्या जिद्दीने कॉमर्सची पार्श्वभूमी असतानाही घोणे यांनी जिद्दीने यश संपादन केले आहे. बी.कॉम.मध्ये ८२ टक्के गुण पटकावलेल्या घोणे यांनी वडिलांच्या निधनानंतर रेल्वेत सेवा करण्याचा निर्णय घेतला. भुसावळ येथील रेल्वेच्या प्रशिक्षण कालावधीत त्यांनी फर्स्ट क्लास मिळवला आहे. मालगाडीत गार्ड म्हणून काही वर्षे अनुभव घेतल्यानंतर आता लोकल सेवेत गार्ड म्हणून संधी मिळाली आहे. मेल/एक्स्प्रेसच्या गार्ड बरोबर वंद भारत ट्रेन देखील चालवली आहे.
भारतीय रेल्वेत मोटरमन आणि गार्ड पदासाठी तांत्रिक आणि यांत्रिक ज्ञान आवश्यक मानले जाते. परंतु सिडनॅहॅम कॉलेजमधून बीकॉम आणि फॉरेन ट्रेडमध्ये डिप्लोमा केलेल्या घोणे यांना त्या क्षेत्रात संधी उपलब्ध होत्या. नेमक्या त्याचवेळी मध्य रेल्वेच्या माटुंगा कारशेडमध्ये अ श्रेणीत फिटर असणाऱ्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यास वेगळे वळण मिळाले. अनुकंपा तत्त्वावर नोकरी स्वीकारण्याऐवजी श्वेता यांच्या आईने त्यांना संधी दिली. तेव्हा सहाय्यक स्टेशन मास्तर वा गार्ड अशा दोन श्रेणींमध्ये संधी उपलब्ध होती. मात्र आव्हान स्वीकारण्याच्या वृत्तीतून घोणे यांनी गार्ड होण्याचा निर्णय घेतला.
लेखी आणि वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, भुसावळ येथील प्रशिक्षण केंद्रातील १०३ जणांच्या तुकडीमध्ये एकुतल्या एक महिला प्रशिक्षणार्थी होत्या. प्रशिक्षणादरम्यान तांत्रिक ज्ञानात अव्वल होण्यासाठी, सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नियमित वर्ग झाल्यावर रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला. त्यातून स्वतःच्या नोट्स काढून कौशल्य मिळविले.
७ जुलै २०१५ रोजी म्हणजे नवरात्रीचा पहिल्याच दिवशी सेवेतून निवृत्त झालेले घोणे यांनी अल्पावधीत सर्व जबाबदाऱ्या शिकून घेतल्या. जसई यार्ड ते कल्याण पहिली मालगाडी चालवली. गार्ड म्हणून गाडी तपासणे, ब्रेक तपासणे इत्यादी अनेक कामे असतात. त्यांनी स्पष्ट सांगितले की, त्यांची ड्युटी सुरू झाली की ती पूर्ण झाल्याशिवाय गाडी सोडता येत नाही. त्यामुळे ही ड्युटी अगदी १६ तासांपर्यंतही जाते. त्यात अनेक आव्हानात्मक प्रसंगांनाही तोंड द्यावे लागत असल्याचे घोणे यांनी सांगितले. ड्युटी, ड्रायव्हिंगचे समन्वय, मालगाडीतील बिघाड तपासणे, चाकांकडे घर्षणातील उष्णतेचा परिणाम पाहणे अशी असंख्य कामे त्यात असतात.
मुंबई सेंट्रल येथे राहणाऱ्या श्वेता घोणे यांनी सेवेत स्री -पुरुष असा कोणताही भेदभाव होत नाही, असं सांगितलं. ड्युटी हीच प्राधान्यक्रम असल्याचे श्वेता यांनी सांगितले. देशभरात मालगाडी गार्ड म्हणून काही महिला असल्या तरी मुंबई विभागात त्यांचा पहिला क्रमांक लागतो.
रेल्वेच्या नियमांनुसार लोकल फलाटावर थांब्याची वेळ 20 सेकंद असते. पण प्रवाशांची गर्दी पाहता लोकल कधी कधी सेकंदच्या ऐवजी मिनिटांपर्यंत थांबते.तसेच तांत्रिक बिघाड असो किंवा प्रवासी अपघात अशा अनेक कारणांमुळे ही लोकल उशीराने सोडावी लागते. कारण रेल्वे ट्रॅक फ्री झाल्याशिवाय लोकल स्थानकातून पुढे जाऊ शकतं नाही.
रेल्वे रुळ ओलाडंताना अनेक प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत. सुरुवातीला रेल्वे अपघात पाहिल्यानंतर मानसिक त्रास जाणवत होता. मात्र गेले 10 वर्ष ट्रेन मॅनेजर या सेवेत कार्यरत असल्यामुळे मानसिक त्रास जाणवत नाही. तसेच अपघातात प्रवाशी मृतदेह किंवा मृतदेहाचे तुकडे झाले असतील तर,अशावेळी स्टेशन मास्तरांना त्वरित माहिती द्यावी लागते. त्यानंतर लोकल पुढच्या स्थानकासाठी रवाना होते.