फोटो - सोशल मीडिया
पुणे : पुण्यातील पुरातन शिवमंदिरापैकी एक असलेले नागेश्वर महादेव मंदिर आजही आपले वेगळेपण जपून आहे. सुमारे 700 वर्षांपासून हे शिवमंदिर अस्तित्वात आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील सोमवार पेठेमध्ये नागेश्वर महादेव मंदिर आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या मंदिरात आजही पुरात्तव काळाच्या पाऊलखुणा सहज दिसतात. दगडी मंदिर आणि लाकडी सभामंडप अशी या मंदिराची रचना असून गाभाऱ्यामध्ये मोठे शिवलिंग आहे. पुण्यातील हे नागेश्वर मंदिर हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याअंतर्गत नोंदणी झालेले मंदिर आहे.
नागेश्वर मंदिरात वर्षानुवर्षे भगवान शंकराचे भाविक येत आहेत. अगदी संत तुकाराम महाराजांनी देखील या मंदिराला भेट दिली असल्याचे म्हटले जाते. मंदिराला मागे आणि पुढे अशी दोन भव्य प्रवेशद्वारे आहेत. दोन्ही बाजूंनी मंदिरामध्ये प्रवेश करता येतो. प्रवेशद्वारांवर फुलांचे नक्षीकाम करुन कमान करण्यात आली आहे. वेगवेगळ्या आकारांची ही फुलं पाहता क्षणी मंदिराचे काम जुने असल्याचे लक्षात येते. शिवाचे मुख्य मंदिर दगडी असून गर्भगृह अष्टकोनी आहे. मुख्य गाभाऱ्याची रचना यादव काळातील असून गाभाऱ्याला दगडी छत आहे. मंदिराचा सभामंडप पेशवेकालीन आहे. सावकार अबू शेलकर यांनी या मंदिराचा सभामंडप बांधून घेतला. हा लाकडी सभामंडप दोन मजली आहे. सभामंडपालाला सुंदर कमानी आणि फुलांचे नक्षीकाम असलेले छत आहे. मंदिराला नगारखाना असून यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
नागेश्वर मंदिरामध्ये दगडी आणि रंगकाम केलेली नंदीची मूर्ती आहे. पण या मंदिराचे वैशिष्ट्य असे की गर्भगृहाच्या अगदी समोर कारंजे आहे. गाभाऱ्यासमोरचे हे दगडी कारंजे लक्षवेधी आहे. मंदिराच्या परिसरामध्ये पूर्वी तलाव होता. या तलावातील पाण्याला नागेंद्रतीर्थ देखील म्हटलं जायचं. या तलावाच्या पाण्यामुळे रोग बरे होत होते अशी आख्यायिका जनमाणसांमध्ये पसरली होती. मंदिराचा भव्य परिसर आणि मोठे शिवलिंग भाविकांचे मन प्रसन्न करतो. आसपास वस्ती वाढली असली तरी मंदिरामध्ये नीरव शांतता पसरलेली असते.
नागेश्वर महादेव मंदिराच्या आवारामध्ये दोन मोठे दीपस्तंभ आहेत. तसेच भिंतींवर देवकोष्ट असून त्यामध्ये देवांच्या मुर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये विठ्ठल रखुमाई, शनी, गणपती, हनुमान यांच्या शेंदूरी मुर्त्या आहेत. मंदिराचा कळस रेखीव असून लांबूनही लक्ष वेधून घेतो. नागेश्वर महादेव मंदिर नामशेष होण्याच्या मार्गावर होते. मात्र पालिकेने मंदिराचा जीर्णोद्धार करुन त्याला मूळ स्वरुपात जतन केले. आता पुण्यातील नागेश्वर महादेवाचे मंदिर भारतीय पुरातत्व खात्याने वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे.