फोटो - सोशल मीडिया
प्रिती माने : पुण्यामध्ये घराण्यांच्या नावाने आणि आडनावांनी अनेक मंदिरं आहेत. या मंदिरांची देखभाल आणि वसा या घराण्यांकडे वारसा परंपरेने आलेले आहेत. राहत्या वाड्यांमध्ये भव्य अशी लाकडी बांधकाम असलेली मंदिरं आहेत. शतकानुशतके ही मंदिरं पुण्याच्या वैभव्यशाली इतिहासाची साक्षीदार आहेत. पुण्याला मंदिरांचं शहर अशी ओळख देणारी अनेक मंदिरं शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आहेत. त्यापैकीच एक म्हणजे गुंडाचा गणपती. कसबा पेठेमध्ये हा गुंडाचा गणपती असून या गणपतीला असे नाव का आहे, असा प्रश्न सर्वांना पडतो.
कसबा पेठेतील शिंपी आळीमध्ये हा गुंडाचा गणपती आहे. हे गणपतीचे मंदिरं पेशवेकालीन आहे. गुंडाचा गणपती याची स्थापना नागोजी गुंड नामक व्यक्तीने केल्यामुळे गणपतीला ‘गुंडाचा गणपती’ असंच नाव पडलं. नागोजी गुंड हे पेशवाई दरबाराशी संबंधित होते. मुत्सद्दी नाना फडणीस यांचे नागोजी गुंड हे सहकारी होते. पेशवाई रोजनिशीमध्ये देखील गुंडाचा गणपतीचा उल्लेख आढळतो. गुंडाच्या ‘त्याच्या घराजवळील गणपती’ असा दुसरे बाजीराव पेशवे यांच्या 1810-11 सालामधील रोजनिशीमध्ये उल्लेख आहे. असा हा गुंडाचा गणपती पेशवाईच्या काळापासून नावाजलेला आणि प्रसिद्ध आहे.
गुंडाचा गणपती मंदिर हे लाकडी बांधकामी आणि कौलारु आहे. पेशवाईच्या काळामध्ये मंदिर बांधण्यात आले असून वेळोवेळी त्याची डागडुजी करण्यात आली. मंदिराला लाकडी छत आणि सभामंडप आहे. सभामंडपामध्ये लाकडी खांब असून बसण्यासाठी जागा आहे. मंदिराचे गर्भगृह पूर्णपणे दगडी असून चांदीची कमान आहे. मंदिराला सुबक आणि रेखीव असा कळस आहे. लांबून अगदी कौलारु घरासारखे हे मंदिर भासते.
गुंडाचा गणपतीची मूर्ती पाहून मन सुखावते. गणपतीचे डोळे अगदी रेखीव असून त्यावरुन नजर हटत नाही. गणरायाचे हत्तीचे शीर असलेले या मूर्तीमध्ये स्पष्टपणे दिसून येते. या मंदिरामध्ये पूर्वीच्या काळी दगडी पुरातन अशी मर्ती होती. 3 एप्रिल 1975 रोजी जुन्या मूर्तीचे कवच निघाले. तेव्हा आत अतिप्राचीन सुंदर काळ्या पाषाणातील मूर्ती भग्नावस्थेमध्ये मिळाली. तज्ज्ञांनी या मूर्तीची पाहणी करत ही मूर्ती अतिप्राचीन असून 14 व्या शतकातील असेल असा अंदाज व्यक्त केला. मूर्ती भंगलेली असल्यामुळे तिची पुर्नस्थापना करता आली नाही. त्यानंतर केशव रघुनाथ देशपांडे यांनी पाषाणातून हुबेहूब मूर्ती तयार केली. या मंदिराची सुबकता थक्क करणारी असून डोळे जीवंत असल्याचा भास देतात. गुंडाच्या गणपतीची ही मूर्ती पाच फूट उंचीची असून शेंदूर लेपण केलेली आहे. हा गणराय उजव्या सोंडेचा असून चतुर्भुज आणि दोन्ही पाय खाली सोडून बसलेला आहे. वरच्या दोन्ही हातांत पाशांकुश, डाव्या खालील हातात मोदक आणि उजवा खालील हात आशिर्वाद देताना आहे. मूर्तीची नजर अत्यंत प्रभावी असून पोटावर नाग बांधलेला आहे. गणरायाचे हे पूर्ण आणि सुंदर रुप पाहून गुंडाचा गणपतीचे दर्शन घेणारा प्रत्येक भाविक सुखावतो. मंदिराचे नाव गुंड असले तरी आतील गणरायाची प्रतिमा अत्यंत मनमोहक अशा स्वरुपाची आहे. पुण्यातील ऐतिहासिक अशा गणपतींमध्ये गुंडाचा गणपतीची नक्की गणना होते.