उपराष्ट्रपती की चीफ जस्टीस ऑफ इंडिया...; कुणाला मिळते सर्वात जास्त सॅलरी?
Vice President Salary: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आज (09 सप्टेंबर) उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. राजधानी दिल्लीत आज (९ सप्टेंबर) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार असून रात्रीपर्यंत निकालही जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन आणि ‘इंडिया’ ब्लॉकचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत होत आहेत. इंडिया आघाडी आणि भाजपप्रणित एनडीए मधील खासदार आपलाच उमेदवार विजयी होणार असल्याचे दावे करताना दिसत आहेत. पण भारतात उपराष्ट्रपतींना पगार किती मिळते हे तुम्हाला माहिती आहे का, भारताचे सरन्यायाधीश आणि उपराष्ट्रपती यांच्यामध्ये कोणाला जास्त पगार मिळतो हे तुम्हाला माहिती आहे. असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात असतात.
देशात अशी काही संवैधानिक पदे आहेत जी केवळ प्रतिष्ठेशी आणि जबाबदारीशी संबंधित नाहीत तर त्यांना उत्तम पगार आणि त्यांच्याशी संबंधित अनेक सुविधा देखील आहेत. भारताचे सरन्यायाधीश आणि उपराष्ट्रपतींना मिळणाऱ्या पैशांबद्दल आणि सुविधांबद्दल जाणून घेऊया…
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख म्हणजेच भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) हे पद अत्यंत आदरणीय आहे. सध्या भूषण रामकृष्ण गवई हे देशाचे ५२ वे सरन्यायाधीश आहेत. भारताच्या सरन्यायाधीशांना दरमहा २,८०,००० रुपये वेतन दिले जाते.
याशिवाय त्यांना अनेक भत्ते आणि सुविधा देखील मिळतात. यामध्ये सरकारी निवासस्थान, गाडी, सुरक्षा, कर्मचारी आणि इतर सरकारी सुविधांचा समावेश आहे. सरन्यायाधीशांचा पगार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांपेक्षा जास्त असतो, कारण ते न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावर असतात. सरन्यायाधीशांचे पद न्यायव्यवस्थेशी संबंधित आहे आणि त्यांचे निर्णय संविधानाचे स्पष्टीकरण देण्याचे आणि देशाच्या न्यायिक रचनेला दिशा देण्याचे काम करतात.
भारताचे उपराष्ट्रपती हे देशातील दुसरे सर्वोच्च संवैधानिक पद आहे. उपराष्ट्रपती राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. या पदाच्या जबाबदाऱ्या लक्षात घेता त्यांना दरमहा ४ लाख रुपयांचे वेतन मिळते. फक्त वेतनच नव्हे तर उपराष्ट्रपतींना विविध सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामध्ये अधिकृत निवास व्यवस्था, मोफत वैद्यकीय सेवा, विमान व रेल्वे प्रवासासाठी मोफत सुविधा, फोन व इंटरनेट सेवा तसेच वैयक्तिक सुरक्षा व कर्मचारी यांचा समावेश आहे.
राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणे ही त्यांची मुख्य जबाबदारी असली तरी, राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत किंवा कोणत्याही कारणास्तव त्यांचे पद रिक्त झाल्यास, उपराष्ट्रपती कार्यवाहक राष्ट्रपतीची जबाबदारीही पार पाडतात. त्यामुळे या पदाला विशेष महत्त्व लाभले आहे.