EMMTC-MSLTA Under 14
संभाजीनगर : ईएमएमटीसीतर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी-एमएसएलटीए 14 वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये देशभरातून मुले व मुली दोन्ही गटात 160 हून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स औंरंगाबाद येथे 21 ते 28 ऑक्टोबर 2023 या कालावधीत रंगणार आहे.
एनर्झल यांच्या वतीने आकर्षक बक्षिसे
स्पर्धेच्या या आठव्या मालिकेत होत असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या शिवतेज शिरफ़ुलेला, तर मुलींच्या गटात ओडिशाची आहाना हिला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, स्पर्धेत एकूण एकूण 2 लाख रुपयांची शिष्यवृत्ती खेळाडूंना प्रदान करण्यात येणार असून, स्पर्धेच्या पहिल्या फेरीपासूनच खेळाडूंना एनर्झल यांच्या वतीने आकर्षक बक्षिसे आणि भेटवस्तूही दिल्या जाणार आहेत.
सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी
“मराठवाड्यात अधिकधिक टेनिस कोर्ट, प्रशिक्षक, खेळाडूंमध्ये टेनिसचा होत असलेला प्रसार बघुन आम्हांला खूप आनंद झाला आहे”. असे अय्यर म्हणाले. वर्षा जैन आणि अनुरंग जैन यांनी टेनिस उपक्रमांना दिलेल्या अतुलनीय पठिंब्याबद्दल तसेच, औरंगाबादमध्येच नव्हे तर बीड, परभणी, नांदेड आणि जालना या ठिकाणीही या खेळाच्या प्रचारासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे अय्यर यांनी नमूद केले.
मुख्य फेरीच्या सामन्यांना सुरूवात
याशिवाय मुलांचा मुख्य ड्रॉ 64 चा असेल तर, मुलींचा मुख्य ड्रॉ 48 चा असणार आहे. पात्रता फेरीचे सामने शनिवार, 21 व रविवार, 22 ऑक्टोबर रोजी तर सोमवारी, 23 ऑक्टोबरपासून मुख्य फेरीच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व 200 एआयटीए गुण तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक व 150 एआयटीए गुण देण्यात येणार आहेत.
स्पर्धा संचालक वर्षा जैन असणार असून या स्पर्धेसाठी सेजल केनिया यांची एआयटीए सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे., प्रवीण प्रसाद आणि प्रविण गायसमुद्रे यांची या स्पर्धेसाठी मुख्य रेफ्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये संजय दत्ता यांच्या अध्यक्षतेखाली आणि एमएसएलटीए कौन्सिल सदस्य अली पंजवानी आणि आशुतोष मिश्रा यांचा समावेश आहे.