फोटो सौजन्य - Social Media
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी घेतल्या जाणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामध्ये मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए) तसेच मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (एमएचएमसीटी) या दोन अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश नोंदणीस ७ जानेवारी २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, अर्ज प्रक्रिया, नोंदणी वेळापत्रक तसेच सविस्तर माहिती पुस्तिका ही www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.
सीईटी कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, एमसीए व एमएचएमसीटी व्यतिरिक्त इतर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटी नोंदणी प्रक्रियेलाही लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे संबंधित अभ्यासक्रमासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे अपडेट्स तपासाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी तसेच अर्जदारांची ओळख व पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, यासाठी यंदापासून सीईटी प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी ‘ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडेमिक अकाऊंट रजिस्ट्री (अपार) आयडी’ बंधनकारक करण्यात आला आहे.
तसेच, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी युनिक डिसअॅबिलिटी आयडी (युडीआयडी) असणेही आवश्यक करण्यात आले असल्याची माहिती सीईटी कक्षाने दिली आहे.
या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित (CBT) पद्धतीने ऑनलाईन घेण्यात येणार आहे. परीक्षेची तारीख, वेळापत्रक व इतर तपशील पुढील टप्प्यात जाहीर केले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांना अर्ज भरताना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि कागदपत्रे अचूक भरावीत, अन्यथा अर्ज नाकारला जाण्याची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. तसेच अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत डाउनलोड करून सुरक्षित ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. राज्यातील उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी परीक्षा महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे एमसीए व एमएचएमसीटी अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही नोंदणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून, वेळ न दवडता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






