फारुख इंजिनिअर आणि लॉयड (फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. हा सामना २३ जुलैपासून सुरु झाला आहे. बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर भारत फलंदाजी करत आहे. या सामन्यापूर्वी, माजी भारतीय यष्टीरक्षक फारुख इंजिनिअरला मोठा सन्मान करण्यात आला आहे.मँचेस्टरमध्ये एका स्टँडला त्यांचे नाव देण्यात आले आहे. परदेशी मैदानावर स्टँड बांधणारा फारुख इंजिनिअर हे पहिले खेळाडू ठरले आहेत. यासोबतच, वेस्ट इंडिजचे माजी महान फलंदाज क्लाइव्ह लॉयड यांचे देखील नाव एका स्टँडला देण्यात आले आहे.
भारत आणि इंग्लंडमधील चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळाडू आणि मीडिया सेंटर आणि ओल्ड ट्रॅफर्ड येथील हिल्टन हॉटेलच्या विस्तारावर असलेल्या ‘बी स्टँड’ला औपचारिकपणे सर क्लाइव्ह लॉयड आणि फारुख इंजिनिअर स्टँड असे नाव दिले गेले आहे. लँकेशायर क्रिकेट क्लबमध्ये त्यांच्या प्रचंड योगदानाच्या सन्मानार्थ स्टँडच्या अनावरणाच्या वेळी इंजिनिअर आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज कर्णधार लॉयड हे दोघे देखील हजर होते.
फारुख इंजिनिअर यांनी याबाबत पीटीआयला प्रतिक्रिया दिलीमी, ते म्हणाले की, “हा केवळ माझ्यासाठीच नाही तर भारतासाठी देखील अभिमानाचा क्षण आहे. क्लाइव्ह आणि मी दोघेही सकाळी याबद्दल चर्चा करत होतो. आम्हाला कधीच वाटले नव्हते की आमच्या सन्मानार्थ असे काही करण्यात येईल. देव महान आहे. स्वतःच्या देशातील ओळखीची कमतरता भरून काढली.”
इंजिनिअर (८७ वर्षे) यांनी त्यांचे बहुतेक क्रिकेट मुंबईमध्ये खेळले आहे, विशेषतः ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये. त्यांनी म्हटले आहे की, “जिथे मी बहुतेक क्रिकेट खेळलो तिथे माझ्या कामगिरीला पाहिजे तसा आदर मिळाला नाही हे खूप लाजिरवाणे आहे.” तथापि, २०२४ मध्ये ‘लाइफटाइम अचिव्हमेंट’ पुरस्कार प्रदान केल्याबद्दल इंजिनिअरने बीसीसीआयचे आभार देखील मानले.
लँकेशायर क्रिकेटने एका निवेदन जाहीर केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “लँकेशायर क्रिकेटला हे जाहीर करताना आनंद होत आहे, की क्लबने एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड येथील एका स्टँडचे नाव क्लबच्या दिग्गज खेळाडू आणि ‘हॉल ऑफ फेम’मध्ये स्थान मिळवलेले सर क्लाईव्ह लॉईड आणि फारूक इंजिनिअर यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सकाळी हा समारंभ झाला आहे. ज्यामध्ये क्लबच्या प्रतिनिधींनी फलकाचे अनावरण केले. ”
वेस्ट इंडिजकडून खेळताना दोन वेळा विश्वचषक जिंकणारा कर्णधार लॉईडने १९६८ ते १९८६ दरम्यान लँकेशायरसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २१९ सामने खेळले आहेत. त्यांनी १२,७६४ धावा केल्या आणि ५५ विकेट्स घेतल्या आहेत. लॉईडने क्लबसाठी लिस्ट ए क्रिकेटमध्ये ८,५२२ धावा केल्या असून यामध्ये ६० विकेट्स घेतल्या. १९६९ आणि १९७० मध्ये दोन एकदिवसीय लीग जेतेपदे जिंकून देण्यात लँकेशायरच्या एकदिवसीय यशात मोठे योगदान दिले आहे.
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू फारुख इंजिनियर हे लँकेशायरचे विकेटकीपर होते. त्यांनी १९६८ ते १९७६ पर्यंत क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी क्लबसाठी १७५ सामने खेळले, ज्यात १२६ सामने होते. ५,९४२ धावा करण्यासोबतच त्याने ४२९ झेल घेतले आणि ३५ स्टंपिंग केले आहे.






