केएल राहुल(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. हा सामना २३ जुलैपासून सुरु झाला आहे. बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर भारत फलंदाजी करत आहे. या सामन्यात भारताची सलामीवीर जोडी केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी दमदार भागीदारी केली आहे. पहिला दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ४ विकेट्स गमावून २६४ धावा केल्या होत्या. रवींद्र जडेजा(१९) आणि शार्दूल ठाकुर(१९) धावांवर नाबाद आहेत. या दरम्यान भारताचा सलामीवीर केएल राहुलने एक मोठी कामगिरी केली आहे. त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत चेतेश्वर पुजाराला पिछाडीवर टाकले आहे.
भारतीय सलामीवीर केएल राहुल भारतासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा ७वा फलंदाज ठरला आहे. राहुलने चेतेश्वर पुजाराचा १७६९ धावांचा विक्रम मोडीत काढला. यासोबत पुजाराला मागे टाकत जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये ७ व्या क्रमांकावर जाऊन पोहचला आहे. पुजाराने भारताकडून शेवटचा सामना जून २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हल येथे खेळला होता. त्याने ३५ जागतिक कसोटी अजिंक्यपद सामन्यांमध्ये १७६९ धावा फटकावल्या आहेत.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आपला २८ वा सामना खेळत असणाऱ्या केएल राहुलने ४६ धावांच्या मदतीने पुजाराला पिछाडीवर टाकले आहे. आता त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये १७७३ धावा केल्या आहेत. राहुलने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाच शतके आणि ७ अर्धशतके लगावली आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये केएल राहुलच्या एकूण ६ फलंदाज पुढे आहेत. ज्यांनी २००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
या मालिकेपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा माजी कसोटी कर्णधार रोहित हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. रोहितने ४० सामन्यातील ६९ डावांमध्ये नऊ शतके आणि आठ अर्धशतकांसह एकूण २७१६ धावा केलेल्या आहेत. त्याच्यानंतर ऋषभ पंतचा क्रमांक येतो. त्याने ३७ सामन्यांमध्ये २६७७ धावा फटकावल्या आहेत.चालू मालिकेतील तीन सामन्यांमध्ये ४२५ धावा करणाऱ्या पंतला रोहितचा विक्रम मोडण्यासाठी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्यासाठी चौथ्या कसोटीत किमान ४० धावांची आवश्यकता आहे. परंतु चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याच्या पायाला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले. आता तो मालिकेतून बाहेर पडला आहे.
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटच्या नावावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम जमा आहे. रूटने आतापर्यंत खेळलेल्या ६७ सामन्यांमध्ये एकूण ५९७६ धावा केल्या आहेत. ३४ वर्षीय रूटने यापूर्वी इंग्लंडचे नेतृत्व देखील केले आहे, त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ६००० धावा करणारा जगातील पहिला फलंदाज होण्यासाठी चौथ्या कसोटीत २०४ धावांची गरज आहे.
हेही वाचा : IND vs ENG 4th Test : दुसऱ्या दिवशी मँचेस्टरमध्ये पावसामुळे खेळ खराब होणार? सविस्तर वाचा Weather Report