शिंदेंकडून उबाठाच्या बेगडी हिंदुत्वाचा पर्दाफाश
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबई लुटणाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर बोलू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश आत्मनिर्भर होतोय. त्याच दरम्यान अयोध्येत राम मंदीर उभं राहिले. तसेच बाळसाहेबांचे जे स्वप्न होतं की काश्मिरमधील ३७० कलम हटवावं ते मोदीजींच्या नेतृत्वात अमित शहा यांनी पूर्ण केल. मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाहांवर टीका करणं दुर्देवी, असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. अनेक वर्ष ज्यांनी मुंबई लुटली, मुंबईची तिजोरी धुतली. कोविड काळात रुग्णांची खिचडी गिळली, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातला डांबर खाल्ला, बॉडीबॅगमधून पैसे खाल्ले, खोटी कोविड सेंटर उभी करुन मढ्याच्या टाळुवरचे लोणी खाल्लं, अशा लोकांनी अमित शहांवर बोलणं मोठी शोकांतिका आहे. त्यांचा कुठंतरी समतोल ढासळला आहे त्यामुळे असे असंबधं बोलत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, दोन नंबरवाल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांना शेवटच्या नंबरवर बसवले. मुख्यमंत्री असताना ते घटनाबाह्य पद आहे अशी टीका करत होते. घटनाबाहय शब्द त्यांच्या आवडीचा आहे. त्यांना बाबासाहेबांचे संविधान मान्य नाही त्यामुळे नेहमी ते घटनाबाह्य बोलून टाहो फोडतात, असे ते म्हणाले. त्यांच्या काळात अजित दादा उपमुख्यमंत्री होते. काचेच्या घरात राहणाऱ्यानी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारु नये, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आताची त्यांची परिस्थिती म्हणजे केविलवाणी धडपड आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होतो हे त्यांना पचनी पडले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून जळजळ मळमळ सारखी बाहेर पडतेय, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
एकीकडे मुख्यमंत्र्यांना भेटायला बुके घेऊन जायचे आणि दुसरीकडे टीका करायची ही दुटप्पी भूमिका आहे. ज्यांनी सत्तेच्या खूर्चीसाठी स्वत:चे पायपुसणं करुन घेतलं त्यांना मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा अधिकार नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मद्रास हायकोर्टाचे न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्या विरोधात डीएमके आणि उबाठा यांनी महाभियोगाचा प्रस्ताव सादर केला. त्यामुळे उबाठाला हिंदुत्व शिकवण्याची नैतिकता आहे का? असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित आहे. त्यांच्या काळात दहशतवादी याकूब मेमनची कबर सजवली, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी त्यांच्या प्रचारात होते, त्यांनी हिंदुत्व शिकवू नये, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मोठे घोटाळे करणारे लोक व्होटचोरीचा मुद्दा काढत आहेत. ते जेव्हा निवडणुका हरतात तेव्हा यंत्रणा वाईट होते, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. लाडक्या बहिणींची योजना जी सुरु केली ती कधीही बंद होणार नाही. तसेच यो योजनेसाठी जे आश्वासन सरकारने दिले आहे ते पूर्ण करणार, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
अतिवृष्टीबाबत राज्य सरकारने शेतकऱ्यांना ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असून त्यातील १४ हजार कोटींची मदत प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्य खात्यात जमा झाल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. अमरावती ३४१५ कोटी, छत्रपती संभाजी नगरसाठी ६२४९ कोटी, कोकण विभाग ४० कोटी, नागपूरसाठी ७१६ कोटी आणि नाशिक विभागाला १५५३ कोटी असे एकूण १४ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत अशी ओरड म्हणजे खोटारडेपणाचा कळस आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.






