फोटो सौजन्य - Social Media
रज्जो मुंबईत एका मॅगझिनमध्ये फोटोग्राफर म्हणून काम करत होती. क्षण टिपण्याचा तिचा छंदच तिचे कौशल्य बनले होते. एके दिवशी बॉसने तिला काही पडीक, जीर्ण आणि सुविधाविहीन शाळांचा शोध घेऊन त्यावर रिपोर्ट तयार करण्याचे काम दिले. हे रिपोर्ट्स छापले की संबंधित शाळांचे ट्रस्टी जागे होतील, हा उद्देश होता.
रज्जोने सांगितले की ती सातवीपर्यंत कोल्हापुरात शिकली आहे आणि तिची जुनी शाळाही सध्या खूप वाईट स्थितीत असल्याचे तिने ऐकले आहे. ती तेच ठिकाण कव्हर करू शकते, असे तिने बॉसला सांगितले. परवानगी मिळाल्यावर ती एका छोट्या टीमसह कोल्हापुराजवळच्या गावात पोहोचली. घरी जाऊन आई-वडिलांना भेटली, पण जेव्हा कामाबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी तिला त्या शाळेत न जाण्याचा कठोर इशारा दिला. तरीही रज्जो ऐकायला तयार नव्हती.
परवाना काढून टीम शाळेत पोहोचली. तिथे रज्जोने दूरवर एक छोटी मुलगी पाहिली. ती मुलगी एका वर्गात जात होती आणि काही वेळाने पुन्हा बाहेर येत होती हेच तिचं वारंवार सुरू होतं. रज्जोने तिच्याजवळ जाऊन विचारले, “बाळ, काय झालं?” मुलगी म्हणाली, “आत बाई रागावल्या आहेत.” रज्जो वर्गात गेली, पण आत कुणीच नव्हतं. बाहेर आली तर ती मुलगीही गायब. एवढ्यात तिच्या कानात त्या मुलीच्या हसण्याचा विचित्र आवाज घुमला. रज्जोने ते दुर्लक्षित केले. पण शाळा सुरू असल्याने कामात अडथळा येत होता. म्हणून तिने टीमला सांगितले की आपण रविवारी यायचं आणि पियुनलाही बोलवायचं, म्हणजे कुणाचा त्रास होणार नाही.
रविवारी टीम आली. शाळेत भयाण शांतता होती. फोटोग्राफी करताना रज्जोच्या नजरेत एका वर्गाचं कुलूप पडलं. कुलूपावर तावीजं, धागे बांधलेले होते. हाच तो कालचा वर्ग. रज्जोने धागे काढले आणि आत जाऊन फोटो काढायला सुरुवात केली. तेवढ्यात पियुन दारात येऊन जोरात ओरडला, “मॅडम, हे दार उघडलं कोणी? इतकी वर्षं हा वर्ग बंद आहे. इतके ताईत बांधलेले दिसत नाहीत का? काही कारणानेच हे बंद असतं!” रज्जो घाबरली आणि म्हणाली, “काल तर हा वर्ग उघडा होता!” आणि तिने कालची मुलगी दिसल्याची सगळी गोष्ट सांगितली.
Horror Story : ‘लिंबा’वर ठेवला पाय, शरीरात शिरली ‘ती’; दर्ग्यातही जायला …
क्षणाचीही उशीर न करता पियुन सगळ्यांना गावातील मौलानाकडे घेऊन गेला. मौलाना म्हणाला की त्याच्या वडिलांनीच हा वर्ग तावीजांनी बंद केलेला होता. “ते ताईत कुणी तरी आधीच काढले आहेत म्हणूनकाल तिला तो वर्ग उघडा दिसला. लगेच बंद केला नाही, तर इथे मोठं अनर्थ होऊ शकतं,” असा इशारा मौलानाने दिला. मौलाना तातडीने त्या वर्गाला पुन्हा ताईत बांधून बंद करतो. मात्र रज्जो ही घटना मॅगझिनमध्ये छापत नाही… कारण तिने पाहिलेलं, ऐकलेलं आणि अनुभवलेलं सत्य तिच्या आजही अंगावर काटा आणतं.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)






