गँजेस ग्रँडमास्टर्स संघ ठरला चॅम्पियन
दोन टप्प्यांत खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत गँजेस ग्रँडमास्टर्स संघाने ७-५ अशा फरकाने बाजी मारली. पहिल्या टप्प्यात दोन्ही संघांमध्ये ३-३ अशी बरोबरी झाली होती. मात्र, दुसऱ्या टप्प्यात गँजेसच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत सामना आपल्या बाजूने झुकवला. दुसरीकडे, तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत ‘अमेरिकन गॅम्बिट्स’ संघाने ‘मुंबा मास्टर्स’ संघाचा ७.५-४.५ अशा फरकाने पराभव करत कांस्यपदक निश्चित केले.
ग्लोबल चेस लीगचा हा चौथा मोसम अत्यंत चुरशीचा ठरला. सहभागी झालेल्या सर्व सहा संघांचे आव्हान आठव्या फेरीअखेर उपांत्य फेरीसाठी कायम होते. साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात मुंबा मास्टर्सने गॅम्बिट्सवर विजय मिळवल्यामुळे पायपर्स संघाचा अंतिम फेरीतील प्रवेश सुकर झाला होता. मात्र, गुणतालिकेत अव्वल स्थानासह अंतिम फेरीत पोहोचलेल्या गँजेस ग्रँडमास्टर्सवर त्यांना मात करता आली नाही.
साखळी फेरीच्या तुलनेत अंतिम फेरीतील लढतीचे स्वरूप पूर्णपणे वेगळे होते. काळ्या मोहरा घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंनी पांढऱ्या मोहरांविरुद्ध ४ विरुद्ध ३ अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या टप्प्यातील ३-३ अशा बरोबरीनंतर पायपर्स संघाकडे जेतेपद राखण्याची मोठी संधी होती; कारण कार्लसन पहिल्या पटावर मजबूत स्थितीत खेळत होता.
परंतु, नेपोम्नियाचीविरुद्धच्या निर्णायक डावात कार्लसनने २८ व्या चालीत मोठी घोडचूक केली. या चुकीनंतर त्याला सावरण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. त्याच वेळी स्तावरूला सोलासकिडाऊ हिने भारताच्या कोनेरू हम्पीवर मात करत गँजेसच्या ऐतिहासिक विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, पहिल्या डावात लेव्हॉन अरोनियनने अनिश गिरीविरुद्ध आक्रमक सुरुवात केली होती, मात्र ४९ व्या चालीअखेर वेळेच्या कमतरतेमुळे त्याला विजयापासून वंचित राहावे लागले. दुसऱ्या बाजूला अन्य पटांवरील लढती बरोबरीत सुटत असताना व्होलोदर मुर्जिनने ल्युक लिऑन मॅनडोंकाविरुद्ध ४९ चालींत विजय मिळवत पायपर्सला पहिल्या फेरीत ३-३ अशी बरोबरी साधून दिली होती.
‘खेलेगा इंडिया, खिलेगा इंडिया!’ जयराज क्लबमध्ये रंगल्या बॅडमिंटन, टेबल टेनिसच्या चुरशीच्या लढती
वैयक्तिक पुरस्कार आणि गौरव
अंतिम सामन्याचा मानकरी: इयान नेपोम्नियाची (गँजेस ग्रँडमास्टर्स)
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू: स्तावरूला सोलासकिडाऊ (गँजेस ग्रँडमास्टर्स) – १२ सामन्यांत ६ विजय आणि ३ बरोबरींसह २१.५ गुण (जावा क्रूझर बाईक देऊन गौरव).
अपराजित खेळाडू: हरिका द्रोणावल्ली (मुंबा मास्टर्स) – संपूर्ण स्पर्धेत १२ सामन्यांत ४ विजय आणि ८ बरोबरींसह १८.५ गुण मिळवून एकही सामना न गमावणारी एकमेव खेळाडू.
तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीचा मानकरी: निहाल सरीन (अमेरिकन गॅम्बिट्स).
विजय मिळवल्यानंतर नेपोम्नियाची म्हणाला, “काळ्या मोहरांसह खेळण्याची माझी पूर्ण तयारी होती. कार्लसनविरुद्ध खेळताना समोरच्याने चूक करावी अशी अपेक्षा करण्यापलीकडे काही करता येत नाही; आज कार्लसनने ती चूक केली आणि मी नशीबवान ठरलो. मात्र, हे यश सांघिक कामगिरीचे फळ आहे.”






