करून नायर(फोटो-सोशल मीडिया)
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली आहे. तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवण्यात आली. या मालिकेत शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने दमदार कामगिरी करून दाखवली आहे. कर्णधार शुभमन गिलने तर धावांचा पाऊस पाडाला आणि टेस्ट क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडले आणि अनेक विक्रम रचले आहेत. या सर्व मालिकेत भारताचा खेळाडू करुण नायरला मात्र मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही. या मालिकेत तो चार सामने खेळला मात्र त्याला फालंदाजीमध्ये छाप पाडता आलेली नाही. आता आगामी कसोटी सामना ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध भारतात खेळवला जाणार आहे. यावेळी करुणवर संघातून वगळण्याची टांगती तलवार असणार आहे. अशातच इंग्लड दौऱ्यानंतर करुण नायरने एक भावुक पोस्ट लिहिली आहे. त्यानंतर चाहते त्याला निवृत्तीच्या शुभेच्छा देत आहेत.
संपूर्ण मालिकेत शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी चांगली फलंदाजी केली. यामध्ये या फलदाजांनी शतके देखील झळकावले आहे. परंतु, करूण नायरची बॅट मात्र या मालिकेत म्यान राहिली. तो या मालिकेत फक्त एकच अर्धशतक झळकवता आले. त्यामुळे पुढच्या मालिकेत त्याला संघातून वगळण्यात येण्याची चर्चा रंगू लागली आहे. यादरम्यान त्याने आता सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ज्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. त्याने लिहिलेली पोस्ट खूप भावुक आहे. त्या पोस्टखाली चाहत्यांकडून रिटायरमेंटच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. नायरने निवृत्ती घेतली नसली तरी चाहत्यांकडून त्यापद्धतीने अर्थ काढून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
करूण नायरने आपल्या इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, “जिथे प्रत्येक धाव कठोर परिश्रम असते आणि प्रत्येक विकेट एक बक्षीस असते. ती तुमच्या मनाला, शरीराला आणि आत्म्याला आव्हान देत असते दिवसरात्र. गेल्या काही महिन्यांत, आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत आणि या संघाने उद्देशपूर्ण संघर्ष म्हणजे काय हे देखील दाखवून दिले? कोणताही शॉर्टकट यामध्ये नाही, फक्त योग्य प्रयत्न आणि संघाचा अभिमान आणि एक उत्तम शेवट. काय प्रवास होता!”. अशी पोस्ट करुण नायरने केली आहे.
करूण नायरच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली. एका चाहत्याने प्रतिक्रिया दिली त्यामध्ये त्याने करुणला निवृत्तीचा शुभेच्छा दिल्या आहेत. यानंतर त्याच्या निवृत्तीबाबतच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. परंतु, त्याने आपल्या निवृत्तीबाबत काही एक सांगितलेले नाही. त्यामुळे त्याला अजूनही वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघात संधी मिळण्याची आशा आहे. कारण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी शानदार राहिली आहे.
इंग्लंड दौऱ्यात करूण नायरने ४ सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 8 डावांमध्ये २५ च्या सरासरीने केवळ २०५ धावा केल्या आहेत. यात फक्त एक अर्धशतक आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत करूण नायरला ८ वर्षानंतर संघात स्थान देण्यात आले. मात्र त्याला फलंदाजीत आपली जादू दाखवता आली नाही. आता करूण नायर दुलीप ट्रॉफीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात फिल्डिंग करताना करूण नायरच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यात थोडं फ्रॅक्चर असलयाचे समोर आले आहे.. त्यामुळे नायरचे दुलीप ट्रॉफी खेळणं कठीण मानले जात आहे.