मोहम्मद सिराज(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळवेळी जात आहे. या मालिकेतील आतापर्यंत ३ सामने खेळवण्यात आले आहेत. या ३ सामन्यांमधील २ सामने इंग्लंडने जिंकून मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर भारतीय संघात आक्रमकता लयास जाईल अशी अटकळ बांधल्या जात होती. परंतु, युवा शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आपल्या टीकाकारांना आपल्या कामगिरीतुन सडेतोड उत्तर दिले आहे. नुकताच लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडकडून भारताला २२ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताने इंग्लंडला जोरदार टक्के दिली. भारतीय खेळाडू प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून आलेत.
लॉर्ड्स कसोटी दरम्यान, दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये छोटे मोठे वाद देखील झाल्याचे दिसून आलेत. या दरम्यान, भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांनी इंग्लिश फलंदाजांना केवळ आपल्या खेळानेच नव्हे तर आपल्या देहबोलीने देखील घाबरवले. दरम्यान, विकेटनंतर बेन डकेटशी झालेल्या किरकोळ वादानंतर, आयसीसीने सिराजला सामना शुल्काच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला. आता आयसीसीच्या या निर्णयावर इंग्लंडच्या एका माजी अनुभवी खेळाडूकडून संताप व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा : IND vs ENG : वैभव सूर्यवंशीचा इंग्लंडमध्ये बोलबाला! ३० षटकारांची केली बरसात, मिळाला मोठा सन्मान; पहा व्हिडीओ
लॉर्ड्स कसोटीदरम्यान, बेन डकेटची विकेट घेतल्यानंतर मोहम्मद सिराजने आक्रमकपणे आपला आनंद साजरा केला. परंतु, इंग्लिश फलंदाजाविरुद्ध सिराजने आपलाआनंद साजरा करणे चांगलेच महागात पडले. त्यानंतर आयसीसीकडून सूरजला शिक्षा सुनावण्यात आली. आता इंग्लंडचा माजी अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आयसीसीच्या या निर्णयावर शंका उपस्थित केली आहे. एका इंग्रजी पॉडकास्टवर बोलताना स्टुअर्ट ब्रॉडने म्हटले आहे की, आयसीसीने सिराजवर लावण्यात आलेला दंड त्याला खूप मजेदार वाटतो.
क्रिकेट पॉडकास्ट फॉर द लव्ह क्रिकेटवर बोलताना ब्रॉड म्हणाला कि, “डकेटशी वाद घातल्याबद्दल सिराजला १५ टक्के दंड आकारण्यात आला होता, मला ते खरोखर खूप मजेदार वाटले. त्याने मोठी विकेट साजरी करण्याशिवाय काहीही केले नाही.”
एजबॅस्टननंतर मोहम्मद सिराजने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर शानदार कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात दोन विकेट घेतल्या. त्यानंतर त्याने दुसऱ्या डावात देखील दोन विकेट घेतल्या. या दरम्यान, त्याने अव्वल फलंदाज बेन डकेट आणि ऑली पोप या महत्वाच्या विकेट्स काढल्या.