हार्दिक पंड्या(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : आशिया कपमध्ये(Asia cup 2025 )भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठा महामुकाबला होणार आहे. रविवारी, २८ सप्टेंबर रोजी आशिया कप मधील अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला एक अनोखे शतक करण्याची संधी चालून आली आहे. हार्दिक पंड्याने आशिया कपच्या या हंगामात आधीच चार बळी टिपले आहेत. यासह, त्याने टी-२० फॉरमॅटमध्ये त्याच्या बळींची संख्या ९८ वर आणली आहे. दोन्ही देशांमधील विजेतेपदाचा सामना रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आशिया कपच्या ४१ वर्षाच्या इतिहासात पहिलीच वेळ आहे की भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात आमनेसामने आले आहेत.
हार्दिक पंड्याने २०१६ पासून भारतासाठी १२० टी-२० सामने खेळलेले आहेत. ज्यामध्ये त्याने २६.५८ च्या सरासरीने ९८ विकेट्स चटकावल्या आहेत. या काळात, पंड्याने एका डावात तीन वेळा चार किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याची किमया देखील केली आहे. जर पांड्याने पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात दोन विकेट्स घेतल्या तर तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स घेणारा दुसराच भारतीय खेळाडू ठरू शकतो.
हेही वाचा : IND VS PAK : पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मा रचणार इतिहास! रोहित-रिझवानसारख्या दिग्गजांना मागे टाकणार ..
सध्या टी-२० क्रिकेटमध्ये शतकी विकेट्स घेण्याचा विक्रम फक्त एकाच भारतीय खेळाडूच्या नावावर जमा आहेत. अर्शदीप सिंगने २०२२ पासून ६५ सामन्यांमध्ये १८.७६ च्या सरासरीने १०१ विकेट्स घेतल्या आहेत. जागतिक स्तरावर सर्वाधिक टी-२० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांचा विचार केला तर, रशीद खान १०३ सामन्यांमध्ये १३.९३ च्या सरासरीने १७३ विकेट्स घेत यादीमध्ये अव्वल स्थानी आहे.
पाकिस्तानविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हार्दिक पंड्याने असाधारण कामगिरी केली आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आठ डावांमध्ये १५ बळी टिपले आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये डॉट बॉलला खूप महत्व असते आणि हार्दिकचा पाकिस्तानविरुद्ध डॉट बॉलचा टक्का ४७.९ इतका आहे. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट ११.० होता आणि त्याची सरासरी १४.६ होती. पाकिस्तानविरुद्ध त्याचा इकॉनॉमी रेट ७.९६ आहे.
भारतीय संघ आशिया कप स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. भारताने सलग सहा सामने जिंकून आशिया कप २०२५ च्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. भारताने पाकिस्तानला या स्पर्धेत दोन वेळा पराभूत केले आहे. आता अंतिम सामन्यात भारतीय संघ पाकिस्तानला तिसऱ्यांदा पराभूत करून आशिया कपचे जेतेपद आपल्या नावावर करेल.