श्रेयंका पाटील (फोटो- ians)
दुखापतीमुळे श्रेयांका पाटील संघाबहेर
कर्नाटकच्या बंगळुरू येथे श्रेयांका पाटीलचा जन्म
आरसीबीकडून घेतल्या सर्वाधिक विकेट्स
Shreyanka Patil/तेजस भागवत: सध्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 सुरू आहे. भारताने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर आज आपण ‘द मेकिंग ऑफ अ क्रिकेटर‘ या सिरिजमध्ये श्रेयांका पाटीलबद्दल जाणून घेणार आहोत. आलेल्या संकटांवर मात करून तिथून फिनिक्स पक्षासारखी झेप घेणं यालाच संघर्ष म्हटले जाते. वयाच्या 23 व्या वर्षी क्रिकेट विश्वात आपले अस्तित्व निर्माण करणाऱ्या श्रेयांका पाटीलने केलेला संघर्ष आणि मेहनतीची कहाणी जाणून घेऊयात.
श्रेयांका पाटीलचा जन्म कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथे झाला. 31 जुलै 2002 रोजी तिचा जन्म झाला. तिचा क्रिकेटमध्ये करियर करण्याचा प्रवास खूप प्रेरणादायी असा आहे. तिला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि विराट कोहलीच ती प्रचंड मोठी चाहती होती. वयाच्या 7 ते 8 व्या वर्षापासूनच तिने आपले स्वप्न पूर्ण करण्याचे पहिले पाऊल टाकले. 8 व्या वर्षी तिने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. आरसीबीची चाहती ते भारतीय क्रिकेट संघात आणि आरसीबीच्या संघात खेळण्याचा तिचा प्रवास थक्क करणारा आहे.
श्रेयांका पाटीलचे वडील आणि त्यांचा भाऊ हे देखील क्रिकेट खेळायचे. तिचे वडील देखील क्रिकेट अकादमी चालवतात. त्यामुळे क्रिकेटची आवड तिला लहानपणापासूनच निर्माण झाली होती. सुरुवातीला ती मध्यमगती गोलंदाजी करत असे. मात्र तिने तिच्यातील कौशल्य ओळखून ऑफ ब्रेक स्पिन गोलंदाजी सुरू केली आणि आज ती भारतीय महिला क्रिकेटमधील एक यशस्वी गोलंदाज म्हणून ओळखली जात आहे.
प्रशिक्षक अर्जुन देव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेयंका पाटीलच्या करियरला मोठी उभारी मिळाली. त्यांनी श्रेयंका पाटीलमधली क्रिकेट खेळण्याप्रतीचे प्रेम आणि अफाट क्षमता ओळखली. तिथूनच श्रेयंका पाटीलचा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळण्याचा प्रवास सुरू झाला. वयाच्या 17 व्या वर्षी श्रेयंकाने कर्नाटकच्या वरिष्ठ महिला संघात आपले स्थान पक्के केले.
कसा राहिला तिचा क्रिकेटचा प्रवास?
श्रेयंका विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांची मोठी चाहती आहे. 2023 मध्ये आयपीएल प्रमाणेच डब्ल्यूपीएलची सुरुवात करण्यात आली. 2023 मध्ये आरसीबीने श्रेयंकाला आपल्या संघात सामील करून घेतले. 2024 चा हंगाम श्रेयंकाने गाजवला. या हंगामात तिने आरसीबीकडून सर्वाधिक 13 विकेट्स घेत ‘पर्पल कॅप’ आपल्या नावावर केली. अंतिम सामन्यात भेदक गोलंदाजी करत तिने आरसीबीला विजेतेपद मिळवून दिले होते.
2023 हे वर्ष तिच्यासाठी आनंदाचे ठरले. तिने थेट भारतीय संघात प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने आपला पहिलं इंटरनॅशनल सामना खेळला. परदेशांमध्ये होणाऱ्या स्पर्धा खेळणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. यंदा इंग्लंडमध्ये होत असलेल्या टी 20 वर्ल्ड कप संघात तिची निवड झाली आहे. तिने पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. मात्र दुर्दैवाने दुसऱ्या म्हणजेच नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे ती पुढील सामने खेळू शकणार की नाही याबाबत अद्याप कळू शकलेले नाही. भारतीय संघाकडून वर्ल्ड कप खेळण्याचे तिचे स्वप्न दुखापतीमुळे दूर राहणे हे तिच्यासाठी खूप वेदनादायी आहे. मात्र लवकरच या दुखापतीमधून सावरून भारतीय संघाकडून खेळताना दिसेल असा विश्वास क्रिकेटविश्वातून व्यक्त केला जात आहे.






