Chess Championship : राष्ट्रीय स्पर्धेच्या तिकिटासाठी 387 बुद्धिबळपटूंचा बुद्धीसंग्राम; उद्यापासून दुसरा टप्पा
Chess Championship : राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न उराशी बाळगून राज्यातील शालेय बुद्धिबळपटू सज्ज झाले आहेत. एसबीआय लाइफ महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा दुसरा टप्पा शुक्रवार, 13 नोव्हेंबरपासून दहिसर (पश्चिम) येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत तब्बल 387 खेळाडूंचा सहभाग असून, राष्ट्रीय स्पर्धेतील स्थान मिळवण्यासाठी सहाही गटांत चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.
इंडियन चेस स्कूलच्या वतीने आयोजित या स्पर्धेत 9, 13 आणि 17 वर्षांखालील मुले व मुली अशा सहा फिडे मानांकित गटांत सामने खेळविण्यात येतील. प्रत्येक गटातील पहिल्या दोन क्रमांकांच्या खेळाडूंना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात 9 वर्षांखालील खुल्या गटात 110, मुलींच्या गटात 56, 13 वर्षांखालील खुल्या गटात 123, मुलींच्या गटात 45, 17 वर्षांखालील खुल्या गटात 38, तर मुलींच्या गटात 15 खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या दोन्ही टप्प्यांतील एकूण खेळाडूंची संख्या 804 वर पोहोचली आहे. पहिला टप्पा 4 ते 6 नोव्हेंबरदरम्यान पार पडला असून, त्यात 417 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
9 वर्षांखालील खुल्या गटात अध्वान ओसवाल (1724) याला अग्रमानांकन मिळाले आहे. ईशान अग्निहोत्री (1618) आणि निहांश खोडे (1572) हे अनुक्रमे दुसरे आणि तिसरे मानांकित खेळाडू आहेत. आरव झावर (1571) आणि पहिल्या टप्प्यात 7 वर्षांखालील खुल्या गटाचे विजेतेपद पटकावणारा इवान दुबे (1545) यांच्याकडूनही कडवी झुंज अपेक्षित आहे.
9 वर्षांखालील मुलींच्या गटात नागपूरच्या गार्गी हरकरे (1568) हिला अग्रमानांकन देण्यात आले आहे. लिया कृष्णन (1558) आणि दीधिती बॅनर्जी (1553) या तिच्या प्रमुख प्रतिस्पर्धी असतील. पहिल्या टप्प्यात 7 वर्षांखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद मिळवणाऱ्या लिया कृष्णनकडेही विशेष लक्ष असेल. इशी सिंग (1538) आणि मिराई सरदाना (1533) यांच्यामुळे या गटातील चुरस आणखी वाढणार आहे.
IND vs NZ: भारत-न्यूझीलंड सामन्यात पुन्हा पावसाचा ‘खेळ’? चौथा वनडे रद्द होणार? पाहा Weather Report
13 वर्षांखालील खुल्या गटात सर्वाधिक 123 खेळाडू सहभागी होणार आहेत. निर्वाण शाह (1956) याला अग्रमानांकन मिळाले असून, ओम रामगुडे (1906) आणि विहान राव (1826) हे त्याचे प्रमुख प्रतिस्पर्धी ठरणार आहेत.
मुलींच्या 13 वर्षांखालील गटात त्वेषा जैन (1697) हिला अग्रमानांकन मिळाले आहे. इहिना अय्यर (1566), निश्का अग्रवाल (1562) आणि तिस्या भट्ट (1524) या तिच्यासमोर आव्हान उभे करतील. पहिल्या टप्प्यात 11 वर्षांखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावणाऱ्या त्वेषाकडून पुन्हा दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
IPL 2027: वादाला आमंत्रण! यावर्षी चक्क बांगलादेशचे ७ खेळाडू लिलावात; कहर म्हणजे मुस्तफिजुरही सहभागी
17 वर्षांखालील खुल्या गटात आर्य बागायतकर (1742) याला अग्रमानांकन मिळाले आहे. युवराज सिंग (1690), सोहम सहमाते (1667) आणि दैविक मेहता (1642) हे त्याचे प्रमुख प्रतिस्पर्धी असतील.
मुलींच्या 17 वर्षांखालील गटात दृष्या नाईक (1713) ही सर्वोच्च मानांकित खेळाडू आहे. हिमांशी तेंडुलकर (1530), इक्षा सोनी (1528) आणि त्रिशा जगताप (1527) यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
अहमदाबाद येथे 16 ते 20 डिसेंबर 2026 या कालावधीत राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धेतील सहाही गटांमधील पहिल्या दोन क्रमांकांच्या खेळाडूंची निवड केली जाणार आहे. त्यामुळे विजेतेपदासोबतच राष्ट्रीय स्पर्धेचे तिकीट मिळवण्यासाठीही प्रत्येक डाव महत्त्वाचा ठरणार आहे.
स्पर्धेसाठी एकूण 60 हजार रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक गटासाठी 10 हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकांच्या खेळाडूंना एसबीआय लाइफ चषक, तर चौथ्या ते दहाव्या क्रमांकावरील खेळाडूंना पदके देऊन गौरविण्यात येणार आहे.
सात फेऱ्यांच्या या स्पर्धेचे संचालन मुख्य पंच आंतरराष्ट्रीय पंच पी. बी. भिलारे यांच्या देखरेखीखाली होणार आहे. स्पर्धेला एसबीआय लाइफचे मुख्य प्रायोजकत्व लाभले असून, रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल हे स्थळ भागीदार आहेत.






