Chess Tournament : इवान दुबेची सातही डावांत शंभर नंबरी कामगिरी
इंडियन चेस स्कूलच्या आयोजनाखाली दहिसर (पश्चिम) येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये ही फिडे मानांकित सात फेऱ्यांची स्पर्धा पार पडली. सात, अकरा आणि पंधरा वर्षांखालील खुल्या व मुलींच्या अशा सहा गटांत तब्बल 417 खेळाडूंनी सहभाग घेतला. अखेरच्या फेरीपर्यंत रंगलेली विजेतेपदाची चुरस आणि टायब्रेकची गणिते यामुळे स्पर्धेत चांगलीच रंगत निर्माण झाली.
सात वर्षांखालील खुल्या गटात अग्रमानांकित इवान दुबेने सातही डाव जिंकत निर्विवाद विजेतेपद पटकावले. ब्रेनियाक्स इंटरनॅशनल स्कूलच्या इवानने सात गुणांसह अव्वल स्थान मिळवले. ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलचा युवांश निमजा सहा गुणांसह दुसरा, तर विबग्योर हायस्कूल, खारघरचा अद्विक वर्मा सहा गुणांसह टायब्रेकच्या आधारे तिसरा ठरला.
याच वयोगटातील मुलींच्या विभागात कानाकिया इंटरनॅशनल स्कूलची अग्रमानांकित लिया कृष्णन सहा गुणांसह विजेती ठरली. विटी इंटरनॅशनल स्कूलची एलेनॉर डिसोझा आणि नीरजा जाधव यांनी प्रत्येकी साडेपाच गुण मिळवत अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले.
अकरा वर्षांखालील खुल्या गटात एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, रहाटणीचा कौशिक अजिंक्य रायते याने साडेसहा गुणांसह विजेतेपद पटकावले. सीएनएम मुंबईचा अगस्त्य एन. कसाट आणि मॅट्रिक्स अकॅडमी स्कूलचा वीरेन रोहित बोरिचा यांनी प्रत्येकी सहा गुण मिळवत अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले.
मुलींच्या गटात ग्रीनलॉन्स हायस्कूलची अग्रमानांकित त्वेषा आशिष जैन हिनेही साडेसहा गुणांसह विजेतेपदाला गवसणी घातली. गुंदेचा एज्युकेशन अकॅडमीची आश्वी अंकित अग्रवाल सहा गुणांसह उपविजेती ठरली, तर आर. एन. पोदार स्कूलची सानामरी जॉन पॉल हिने पाच गुणांसह तिसरे स्थान मिळवले.
पंधरा वर्षांखालील खुल्या गटात हिरानंदानी फाउंडेशन इंटरनॅशनल स्कूलचा अग्रमानांकित संविद पासबोला याने सहा गुणांसह विजेतेपद मिळवले. सीएनएम स्कूल, विलेपार्लेचा एएफएम रायन मर्चंट आणि सेंट तेरेसा कॉन्व्हेंट हायस्कूलचा एएफएम तसीन रफिक तडवी यांनी प्रत्येकी साडेपाच गुणांसह अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले.
मुलींच्या विभागात नारायणा ई-टेक्नो स्कूल, अंधेरीची खनक पहारिया सहा गुणांसह विजेती ठरली. सीएनएम स्कूलची महुआ विघ्नेश देशपांडे साडेपाच गुणांसह दुसऱ्या, तर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालयाची प्रणिता भावा पाच गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
या स्पर्धेतील निकालाला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या नियमानुसार सहाही गटांतील पहिल्या दोन क्रमांकांच्या खेळाडूंना आगामी राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे राज्यस्तरीय विजेतेपदाबरोबरच राष्ट्रीय स्पर्धेचे तिकीट मिळवण्यासाठीही खेळाडूंमध्ये अखेरपर्यंत चुरस पाहायला मिळाली.
स्पर्धेच्या समारोपप्रसंगी आंतरराष्ट्रीय पंच पी. बी. भिलारे आणि इंडियन चेस स्कूलचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक तसेच स्पर्धा संचालक प्रफुल झवेरी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकांच्या खेळाडूंना एसबीआय लाइफचे चषक देऊन गौरविण्यात आले. चौथ्या ते दहाव्या क्रमांकावरील खेळाडूंना पदके देण्यात आली. तसेच सहाही गटांतील पहिल्या दहा खेळाडूंना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. अशा प्रकारे एकूण सहा लाख रुपयांची बक्षीस रक्कम वितरित करण्यात आली.
मुख्य पंच आंतरराष्ट्रीय पंच पी. बी. भिलारे यांच्या देखरेखीखाली स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. स्पर्धेला प्रमुख प्रायोजक एसबीआय लाइफ आणि आयोजनस्थळ भागीदार रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल यांचे सहकार्य लाभले.
Ans: इवान दुबे, लिया कृष्णन, कौशिक अजिंक्य रायते, त्वेषा आशिष जैन, संविद पासबोला आणि खनक पहारिया यांनी सहा गटांत विजेतेपद मिळवले.
Ans: इवान दुबेने सातही फेऱ्यांत विजय मिळवत सात गुणांची शंभर टक्के कमाई केली.
Ans: या स्पर्धेत सात, अकरा आणि पंधरा वर्षांखालील खुल्या व मुलींच्या सहा गटांत एकूण 417 खेळाडूंनी सहभाग घेतला.






